भुजबळांना आणखी एक धक्का, सीएला अटक
By admin | Published: May 5, 2016 12:27 PM2016-05-05T12:27:46+5:302016-05-05T12:27:46+5:30
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छगन भुजबळांचे चार्टर्ड अकाऊंटंट सुनील नाईक यांना अटक केली आहे. सुनील नाईक यांच्या निवासस्थानावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 05 - महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांना आणखी एक धक्का बसला आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छगन भुजबळांचे चार्टर्ड अकाऊंटंट सुनील नाईक यांना अटक केली आहे. सुनील नाईक यांच्या निवासस्थानावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाने सुनील नाईक यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलेला होता. त्यानंतर ईडीने ही अटकेची कारवाई केली आहे. नाईक यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सुनील नाईक हे भुजबळांच्या वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे सीए होते. समीर आणि छगन भुजबळ यांच्या पैशांच्या अफरातफरी आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सुनील नाईक यांच्याकडून महत्वाची माहिती मिळू शकते.
गेल्या आठवड्यात विशेष न्यायाधीश पी. आर. भावके यांनी पंकज भुजबळ यांच्यासह 28 जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश ईडीला दिले होते.
भुजबळांना अटक
महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावले होते. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली होती. १४ मार्चला ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती.