सृष्टीची आणखी एका विक्रमाला गवसणी!

By admin | Published: October 8, 2015 02:29 AM2015-10-08T02:29:31+5:302015-10-08T06:30:08+5:30

वय केवळ ११ वर्षे ! पण उमरेडच्या वेकोलि परिसरात राहणारी सृष्टी शर्मा या बालिकेने लोएस्ट लिम्बो स्केटिंगमध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’साठी बुधवारी यशस्वी प्रयत्न करीत

Another record of creation! | सृष्टीची आणखी एका विक्रमाला गवसणी!

सृष्टीची आणखी एका विक्रमाला गवसणी!

Next

नागपूर : वय केवळ ११ वर्षे ! पण उमरेडच्या वेकोलि परिसरात राहणारी सृष्टी शर्मा या बालिकेने लोएस्ट लिम्बो स्केटिंगमध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’साठी बुधवारी यशस्वी प्रयत्न करीत आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
वर्धमाननगरच्या सेंटर पॉर्इंट स्कूल येथील स्केटिंग रिंकवर सृष्टीने १९ सेंटीमीटर उंचीच्या समांतर बारमधून २५ मीटर लांब अंतराचे अवघड आव्हान पूर्ण करताच उपस्थित शेकडो विद्यार्थी आणि गणमान्य नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सृष्टीच्या या विक्रमी कामगिरीचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले. ही प्रतिभावान स्केटर इथेच थांबली नाही. काही वेळाच्या अंतराने सृष्टीने आधी १८ व त्यानंतर १७ सेंटीमीटर उंची यशस्वीरीत्या पूर्ण करीत लिम्बो स्केटिंगमध्ये नव्या अध्यायाची नोंद केली. लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडद्वारा सुरू असलेल्या ‘बेटी बचाव’ या आगळ्यावेगळ्या मोहिमेत सेंटर पॉर्इंट स्कूलचे योगदानदेखील मोलाचे ठरले. ‘वंडर गर्ल स्केटर’ सृष्टीचा उत्साह वाढविण्यासाठी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे
चेअरमन खा. विजय दर्डा, वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा व
इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. (क्रीडा प्रतिनिधी)

असा नोंदविला विक्रम!
सृष्टीने सर्वप्रथम १९ सेंटीमीटरची उंची पूर्ण करताच मागचा २२.५ सेंटीमीटर उंचीचा रेकॉर्ड मोडीत निघाला. त्यानंतर ती १८ सेंटीमीटर उंचीच्या बारमधून २५ मीटर लांब अंतर गाठण्यात यशस्वी झाल्यानंतर १७ सेंटीमीटर उंचीच्या बारमधूनही अलगद बाहेर पडताच शाळेच्या परिसरात उत्साहाला उधाण आले होते.
सृष्टीच्या यशाचे व्हीडिओ चित्रण आणि फोटो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहेत. तिचा हा विक्रम प्रमाणित होताच सृष्टीला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

सृष्टीची कामगिरी गौरवास्पद : खा. दर्डा
खा. विजय दर्डा म्हणाले, सृष्टीची कामगिरी आम्हा सर्वांसाठी गौरवास्पद आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या चिमुकल्या स्केटर्सकडून प्रेरणा घ्यावी. शालेय शिक्षणातही ती अव्वल असून परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवित सृष्टीने स्वत:ची योग्यता सिद्ध केली आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी करण्याचे आवाहन दर्डा यांनी विद्यार्थ्यांना केले. 

सृष्टी वेकोलिची ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर : मिश्रा
सृष्टीच्या डोळे दीपविणाऱ्या कामगिरीने प्रभावित झालेले वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी आपल्या भाषणात सृष्टीला वेकोलिचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर बनविण्याची घोषणा केली.

मला माझ्या कामगिरीचा आनंद आहे. आता माझे लक्ष्य ५० मीटर लिम्बो स्केटिंगचे असेल. यासाठी मी लवकरच तयारी सुरू करणार आहे.
- सृष्टी शर्मा

मुलगी म्हणून मला सृष्टीवर गर्व वाटतो. सोबतच या मोहिमेत लोकमतच्या सहकार्याला सलाम करतो. आनंद व्यक्त करायला आज माझ्याकडे शब्द नाहीत.
- धर्मेंद्र शर्मा, वडील

Web Title: Another record of creation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.