रस्ते कामात आणखी एक घोटाळा उघड

By admin | Published: April 30, 2016 04:30 AM2016-04-30T04:30:25+5:302016-04-30T04:30:25+5:30

रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे उजेडात आल्यानंतर चौकशी समितीने आणखी एक धक्कादायक बाब उजेडात आणली

Another scam in the road work revealed | रस्ते कामात आणखी एक घोटाळा उघड

रस्ते कामात आणखी एक घोटाळा उघड

Next

मुंबई : रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे उजेडात आल्यानंतर चौकशी समितीने आणखी एक धक्कादायक बाब उजेडात आणली आहे़ रस्त्यांच्या खोदकामातून तयार झालेले डेब्रिज एका रात्रीत चक्क चारशे ट्रक साहित्य मुंबईबाहेरील डम्पिंग ग्राउंडवर टाकल्याचे दाखवून ठेकेदारांनी पालिकेला लूटल्याचे समोर आले आहे़
रस्त्यांच्या कामामध्ये सरासरी ५३ टक्के अनियमितता आढळून आली आहे़ या घोटाळ्यात रस्ते व दक्षता विभागाचे अधिकारी गुंतल्याचे चौकशीतून उघड झाले आहे़ पहिल्या टप्प्यात दोन्ही विभागांतील प्रमुख अभियंत्यांवर कारवाई केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील चौकशी सुरू करण्यात आली आहे़ मात्र ठेकेदार अधिकाऱ्यांच्या संगनमताने पालिकेची तिजोरी लुटत असल्याची धक्कादायक माहिती आता चौकशीतून उघड होऊ लागली आहे़ २३ डिसेंबर २०१५ रोजीच्या अंतरिम अहवालानुसार, रस्त्याच्या खोदकामातून मोठ्या प्रमाणात डेब्रिज तयार होऊन जास्त ट्रक डम्पिंग ग्राउंडपर्यंत गेल्याचे प्रमाणपत्र ठेकेदारांनी सादर करत न केलेल्या कामांचे पैसे लाटले आहेत़
>क्रमांक आणि वेळेची नोंद नाही
चौकशी समितीने छाननी केली असता रस्ते खोदकामात बऱ्याच ठिकाणी एकाचवेळी ठेकेदारांनी १० हजार ट्रक डेब्रिज मुंबईबाहेरील डम्पिंग ग्राउंडवर नेल्याचे दाखविण्यात आले आहे़ याचा अर्थ एका रात्रीत चारशे ट्रक डेब्रिज वाहून नेण्यात आले आहे़
हे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे़ तसेच ट्रकचा क्रमांक आणि डम्पिंग ग्राउंडवर गेल्याची वेळ याची कुठेच नोंद नाही़ मोठे बिल मंजूर करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदारांनी हा घोटाळा केल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले आहे़
>अशी पकडली चोरी
पालिकेच्या नियमांनुसार डेब्रिज रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेतच डम्पिंग ग्राउंडवर नेता येते़ त्यामुळे १० तासांत चारशे ट्रक वाहून नेणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे़
तसेच हा गैरव्यवहार उघड होऊ नये, यासाठी ठेकेदारांनी डेब्रिज काढल्याचे नोंद असलेले चलानही सादर केलेले नाही़ चलानवर ट्रक क्रमांक, डेब्रिजचे प्रमाण, वाहकाची माहिती आणि डेब्रिज वाहून नेण्याची वेळ असते़ त्यामुळे ठेकेदारांनी डेब्रिज काढल्याचे मासिक प्रमाणपत्र सादर केले आहे़ रस्ते विभागाकडेही नोंद नाही़
>ठेकेदारांचे प्रताप : मार्च २०१४ ते जून २०१५ या काळात एका ठेकेदाराने दोन ते तीन लाख क्युबिक मीटर डेब्रिज पूर्व उपनगरातून पनवेल येथील गावातल्या डम्पिंग ग्राउंडवर नेल्याचे दाखविले असेल तर चौकशी समितीने प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे डेब्रिज आढळले नाही़
>सखोल चौकशीची मागणी
रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून, सखोल चौकशीसाठी पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची मागणी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली. पालिका मुख्यालयासमोर राष्ट्रवादी नगरसेवकांनी निदशर्ने केली, त्या वेळी ते बोलत होते.

Web Title: Another scam in the road work revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.