वाहनचालकांच्या माथी आणखी एक टोल
By admin | Published: August 21, 2016 06:08 AM2016-08-21T06:08:35+5:302016-08-21T06:08:35+5:30
ठाणे शहरासह जिल्ह्याला टोलचा विळखा पडल्याने ठाणेकर मेटाकुटीला आले असताना आता त्यांच्या माथी आणखी एका टोलचा भुर्दंड पडणार आहे. ठाणे ते बोरीवली या प्रवासाला पर्याय
ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्याला टोलचा विळखा पडल्याने ठाणेकर मेटाकुटीला आले असताना आता त्यांच्या माथी आणखी एका टोलचा भुर्दंड पडणार आहे. ठाणे ते बोरीवली या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजिनीवाडी ते बोरीवलीदरम्यान संजय गांधी उद्यानातून बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित भुयारी मार्गासाठी टोल लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे या १० मिनिटांच्या प्रवासासाठीही ठाणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
मागील युती सरकारच्या काळात महाराष्ट्रात नवनवीन रस्ते, महामार्ग झाले. परंतु, या सर्वांपोटी ‘टोलधाड’ पडल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडले. आता पुन्हा युती शासन सत्तेत आल्यानंतर आणखी एका टोलचा भुर्दंड ठाणेकरांना या भुयारी मार्गाच्या निमित्ताने सोसावा लागणार आहे. ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी टिकुजिनीवाडी ते बोरीवलीपर्यंत ११ किमीचा हा सहापदरी भुयारी रस्ता संपूर्णपणे वन विभागाच्या जागेत बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे चार हजार कोटींचा खर्च केला जाणार असून हे अंतर केवळ १० मिनिटांत कापले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) सल्लागार नेमण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या ठाणे ते बोरिवली हा प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे एक तास लागतो. बोरिवलीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गेटजवळ या भुयारी मार्गाची दुसरी बाजू खुली होणार आहे.
दरम्यान, आता मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यासाठी या प्रकल्पासाठी ‘एमएसआरडीसी’ला कार्यान्वित यंत्रणा म्हणून घोषित केले आहे. तसेच यासाठी सुसाध्यता अभ्यास व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करावी, असेही स्पष्ट केले आहे. भुयारी मार्गासाठी रस्ते खासगीकरणाच्या धोरणात आवश्यक तरतूद करून येथे टोलचे दरही निश्चित करून सुसाध्यता अहवालात त्याचा समावेश करावा, असेही या बैठकीत ठरले. प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास पायाभूत समितीची पुढील मान्यता घ्यावी, असे सरकारने शुक्रवारी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. यामुळे ठाणेकरांना आपला प्रवास पाऊण ते एक तासावरून १० मिनिटांचा करायचा असेल, तर आता या नव्या भुयारी मार्गासाठी टोल भरावा लागणार, हे मात्र यातून निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)
सहापदरी मार्ग
टिकुजिनीवाडी ते बोरीवलीपर्यंत ११ किमीचा हा सहापदरी भुयारी रस्ता बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या ठाणे
ते बोरीवली हा प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे एक तास लागतो. हा भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर हा प्रवास १० मिनिटांमध्ये करता येईल.