आणखी एका विद्यार्थिनीवर अत्याचार, मुख्य आरोपीविरुध्द दुसरा गुन्हा दाखल
By admin | Published: November 5, 2016 09:40 PM2016-11-05T21:40:52+5:302016-11-05T21:52:35+5:30
तालुक्यातील पाळा येथील निवासी आश्रम शाळेतील आणखी एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची बाब पोलिस तपासादरम्यान उघडकीस आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. 5 - : तालुक्यातील पाळा येथील निवासी आश्रम शाळेतील आणखी एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची बाब पोलिस तपासादरम्यान उघडकीस आली आहे. त्यामुळे दुस-या पिडीत विद्यार्थिनीच्या पालकाच्या तक्रारीवरुन मुख्य आरोपी इत्तुसिंग पवार याच्याविरुध्द शनिवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुसºया पिडीत विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली आहे.
पाळा येथील स्व.निंबाजी कोकरे निवासी आदिवासी आश्रम शाळेमध्ये १० वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची तक्रार गुरुवारी हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. त्यानुसार इत्तुसिंग काळुसिंग पवार यासह १३ आरोपींविरुध्द कलम ३७६ (२) (एफ) (आय) (एन), १०९ भादंवि, सह कलम ६, १७, २१ बालकांचे लैंगीक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, सहकलम ३ (२) (५) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सहकलम ७५ बालन्याय (काळजी व संरक्षण) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ११ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी पोलिस कोठडीत आहेत. शुक्रवारी या प्रकरणात आणखी ४ आरोपींना अटक करण्यात आले असून चारही आरोपींना १८ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणाच्या तपासादरम्यान मुख्य आरोपी असलेल्या इत्तुसिंग काळूसिंग पवार याने याच आश्रम शाळेतील आणखी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. एका दुसºया पिडीत विद्यार्थिनीच्या पालकानी दिलेल्या तक्रारीनुसार हिवरखेड पोलिसांनी शनिवारी इत्तुसिंग पवार विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे पहिल्या पिडीत विद्यार्थिनीच्या पालकाच्या तक्रारींमधील सर्व आरोपींविरुध्द पोक्सो कायद्यान्वये तसेच बालन्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.