नगरसेवकाच्या घरी झाली ‘उत्तर’परीक्षा
By admin | Published: May 18, 2017 04:33 AM2017-05-18T04:33:22+5:302017-05-18T04:33:22+5:30
सोमवारी झालेल्या अभियांत्रिकीच्या बी. ई. सिव्हिल शाखेच्या तृतीय वर्षाचा पेपर थेट नगरसेवकाच्या घरात सोडवणाऱ्या २७ विद्यार्थ्यांसह, संस्थाचालक
- लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सोमवारी झालेल्या अभियांत्रिकीच्या बी. ई. सिव्हिल शाखेच्या तृतीय वर्षाचा पेपर थेट नगरसेवकाच्या घरात सोडवणाऱ्या २७ विद्यार्थ्यांसह, संस्थाचालक, प्राध्यापक व नगरसेवक अशा ३३ जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी पहाटे पकडले. शिक्षण क्षेत्राची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
चौका (ता. फुलंब्री) येथील साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजचे हे सर्व विद्यार्थी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे सध्या अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरू आहेत. सोमवारी बी. ई. सिव्हिलचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड ड्राफ्टिंग हा पेपर झाला. याच पेपरच्या उत्तरपत्रिका काही विद्यार्थी शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या सुरेवाडी येथील घरात लिहीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी बुधवारी पहाटे ३च्या सुमारास सुरे यांच्या घरावर छापा टाकला. घरात २४ मुले व तीन मुली उत्तरपत्रिका लिहीत होत्या़, तर प्रा. विजय आंधळे हे त्यांना उत्तरे सांगत होते. या सर्व विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापक, संस्थाचालकांना अटक करण्यात आली आहे.
नगरसेवक सुरे, संस्था अध्यक्ष अॅड. गंगाधर नाथराव मुंढे, संस्थाचालक मंगेश नाथराव मुंढे, प्रा. आंधळे, अमित माणिक कांबळे, प्राचार्य संतोष देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. प्रा. आंधळेच्या ताब्यातून पोलिसांनी आणखी २५ उत्तरपत्रिकांचा गठ्ठा हस्तगत केला़ २३ ड्रॉइंग शीटस् आणि विविध कंपन्यांचे ३१ मोबाइल हँडसेट, रोख ३२ हजार रुपये जप्त करण्यात आले. ‘बिल्डिंग कन्स्ट्रक्शन’ची पुस्तके, गाइडस् आणि नोट्स आढळल्या. या सर्व विद्यार्थ्यांनी अर्ध्याहून अधिक प्रश्न सोडविले होते.
नगरसेवकाचा मुलगाही विद्यार्थी
सीताराम सुरे यांचा मुलगा किरण हासुद्धा साई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी. ई. सिव्हिल तृतीय वर्षात शिकत आहे. त्यानेच वडिलांना सांगून त्याचे घर उपलब्ध केल्याचे समोर आले. सुरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना याविषयी काहीच माहीत नाही. नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता ते झोपले. रात्री कधी ही मुले आणि प्राध्यापक त्यांच्या घरात बसली याविषयी कोणतीही माहिती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
संस्थाचालकांचे कानावर हात
आमच्या महाविद्यालयात बाराशे विद्यार्थी शिकत आहेत. संस्थेच्या स्ट्राँगरूममध्ये उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका असतात. विद्यापीठाच्या समितीच्या ताब्यात हे सर्व साहित्य असते. असे असताना पोलिसांनी विद्यार्थ्यांकडून जप्त केलेल्या उत्तरपत्रिका आमच्या संस्थेतील आहेत अथवा अन्य कोणाकडून आल्या याविषयीची चौकशी प्राचार्यांना करण्यास सांगितली आहे. संस्था अध्यक्ष म्हणून आम्हाला यातील काहीही माहिती नाही, असे संस्था अध्यक्ष अॅड. गंगाधर मुंढे यांनी सांगितले.
पोलीस पथकाला बक्षीस
नगरसेवकाच्या घरी उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी प्रतिपेपर ५ ते १० हजार रुपये आकारले जात होते, अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकारांना दिली. या रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाला त्यांनी ५० हजार रुपये बक्षीस घोषित केले.
परीक्षा केंद्रावर नाममात्र उपस्थिती
पकडलेल्या विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा केंद्रात परीक्षा हॉलमध्ये उपस्थिती नोंदवा. उत्तरपत्रिकेवर तुमचा नंबर लिहा आणि विशिष्ट खूण करा, असे संदेश देण्यात आले होते, असे तपासात समोर आले आहे़