असहिष्णुतेला लेखणीनेच उत्तर द्या
By admin | Published: May 2, 2016 12:40 AM2016-05-02T00:40:47+5:302016-05-02T00:40:47+5:30
असहिष्णुतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत द्याल; पण त्यातून मिळालेली उभारी, बळ कसे परत करणार?, अशा ‘पुरस्कार वापसी’पेक्षा लेखकांनी त्यांचे शस्त्र असलेल्या लेखणीनेच संबंधितांना
नाशिक : असहिष्णुतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत द्याल; पण त्यातून मिळालेली उभारी, बळ कसे परत करणार?, अशा ‘पुरस्कार वापसी’पेक्षा लेखकांनी त्यांचे शस्त्र असलेल्या लेखणीनेच संबंधितांना उत्तर द्यावे. लेखकांनी डोळ््यांसमोर मोठी ध्येये ठेवावीत, असा सल्ला ज्येष्ठ अनुवादक व लेखिका उमा कुलकर्णी यांनी दिला.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित वाङ्मयीन पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात उमा कुलकर्णी यांच्या हस्ते चंद्रकला कुलकर्णी व एल. के. कुलकर्णी यांना ‘गंगे तुझ्या तीराला’ या ललितेतर ग्रंथासाठी डॉ. वि. म. गोगटे पुरस्काराने, प्रणव सखदेव यांना उमेदीने कथालेखनासाठीच्या डॉ. अ. वा. वर्टी पुरस्काराने, सतीश काळसेकर यांना ‘पायपीट’साठी मु. ब. यंदे पुरस्काराने, डॉ. संजय ढोले यांना ‘संकरित’ या लघुकथासंग्रहासाठी पु. ना. पंडित पुरस्काराने, राकेश वानखेडे यांना ‘पुरोगामी’ कादंबरीसाठी धनंजय कुलकर्णी पुरस्काराने गौरवण्यात आले. पाच हजार रुपये, स्मृतिचन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.
सन्मानाला उत्तर देताना एल. के. कुलकर्णी यांनी सांगितले की, गंगेवर ग्रंथ लिहिताना ती कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने महान असल्याचे जाणवले; मात्र प्रदूषणामुळे मन विषण्ण झाले. देशातील नद्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचे ते म्हणाले. प्रणव सखदेव म्हणाले, कथेकडे पूर्वी कादंबरीचा सराव, विरंगुळ््याचे साधन या दृष्टीने पाहिले जात होते. आता मात्र अनेक तरुण लेखक या प्रकाराकडे वळत असल्याने दिलासा वाटतो. भारतीय पुराणकथांचा आधुनिक काळाशी संकर करायला हवा, असेही ते म्हणाले.
सतीश काळसेकर यांनी आयुष्यात वाचन, संगीत व प्रचंड भटकंती केल्याचे सांगितले. त्यातील अंशत: भागच आपल्या पुस्तकात आला असून, या पुस्तकाचे श्रेय मित्राला आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. संजय ढोले म्हणाले, लोकांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी लेखन करीत आहे. सध्या विज्ञान नसलेल्या कथा लिहिल्या जात असल्याने वाचकांत संभ्रम निर्माण होत असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. (प्रतिनिधी)
‘पुरोगामी’ कादंबरीने आपल्याला लेखक म्हणून मान्यता मिळवून दिली. ६० वर्षांत पुरोगामित्व कोठून कोठे येऊन ठेपल्याची मीमांसा करणारी कादंबरी आहे.
- राकेश वानखेडे