जबाबानंतरही गूढ कायम
By admin | Published: October 5, 2015 03:31 AM2015-10-05T03:31:55+5:302015-10-05T03:31:55+5:30
फुटाळा चौपाटीवर गंभीररीत्या भाजलेली निकिता विष्णूदास फुलवानी (२२) हिचे रविवारी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर पोलिसांनीजबाब नोंदवून घेतले
नागपूर : फुटाळा चौपाटीवर गंभीररीत्या भाजलेली निकिता विष्णूदास फुलवानी (२२) हिचे रविवारी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर पोलिसांनीजबाब नोंदवून घेतले. मात्र, तिने नेमके काय सांगितले आणि या प्रकरणामागील पार्श्वभूमी काय त्याचा खुलासा न झाल्यामुळे हे जळीतकांड अधिकच संशयास्पद ठरले आहे.
शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास फुटाळा चौपाटीवर असलेल्या ‘फुडीजफर्स्ट लव्ह’ रेस्टॉरेंटच्या छतावर निकिता जळाली. तिने स्वत:ला जाळून घेतले की कुणी तिला पेटवून दिले, हे स्पष्ट न झाल्यामुळे रात्रीपासून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. निकिताची प्रकृती चिंताजनक असून, तिला मेडिकलमधून मध्यरात्री देवनगर चौकातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे रविवारी दुपारी अंबाझरी पोलिसांनी विशेष न्यायदंडाधिकाऱ्यासमोर तिचे बयाण नोंदवून घेण्यात आले. यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि पोलीस दलाच्या प्रवक्त्या डीसीपी दीपाली मासिरकर यांनी रविवारी रात्री पत्रकारांना या घटनेची माहिती देताना व्यक्तिगत कारणामुळे निकिताने स्वत:ला पेटवून घेतल्याची माहिती दिली. रस्त्यातून तिने एका बाटलीत पेट्रोल आणि माचिस विकत घेतली. त्यानंतर ती रेस्टॉरेंटच्या छतावर पोहचली. तेथे तिने स्वत:ला पेटवून घेतले. यावेळी तिच्यासोबत कुणीच नव्हते, असेही निकिताने सांगितल्याचे डीसीपी मासिरकर म्हणाल्या. पत्रकारांनी वारंवार विचारूनही कारण व्यक्तिगत असल्याने ते सांगता येणार नाही, असे मासिरकर म्हणाल्या.