हुंडाविरोधी चळवळी मंदावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 07:02 AM2017-04-20T07:02:08+5:302017-04-20T07:02:08+5:30
लग्नात हुंडा देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा असला, तरी तो धाब्यावर बसवला जात आहे. पूर्वी हुंडाविरोधी चळवळींनी अशा प्रकारच्या घटना समाजासमोर आणल्या
पुणे : लग्नात हुंडा देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा असला, तरी तो धाब्यावर बसवला जात आहे. पूर्वी हुंडाविरोधी चळवळींनी अशा प्रकारच्या घटना समाजासमोर आणल्या आणि न्याय मिळवण्यासाठी झगडाही केला. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये हुंडाविरोधी चळवळींचे प्रमाण कमी झाले आहे. त्याऐवजी समुपदेशन केंद्रे उभारण्यात आली आहेत. हुंडाविरोधी चळवळीत मुलींनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. वैयक्तिक जागरूकता हाच एकमेव उपाय असल्याचे मत महिला संघटना कार्यकर्त्या आणि जाणकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. हुंडाबळीचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, झोपडपट्टी अशा ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम राबवून कौटुंबिक हिंसाचार कायदा, स्त्रियांचे सामाजिक महत्त्व, कायद्याचे फायदे व तोटे, समुपदेशनाची गरज याविषयी माहिती देणे अपेक्षित आहे. पैसे, दागिने, कपडे, यांसारखी देवाणघेवाण बाजूला ठेवून मुलाची व मुलीची वैद्यकीय तपासणी करणे जास्त आवश्यक आहे, अशी अपेक्षाही या वेळी व्यक्त करण्यात आली.
हुंडाविरोधी चळवळ सुरू केल्यानंतर कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. स्त्रियांबाबत वेगळ्या प्रकारचे कायदे अस्तित्वात आले. स्त्री आपल्या समस्या घेऊन कौटुंबिक न्यायालयात जाऊ शकते, तिथे तक्रार नोंदवू शकते. बऱ्याचदा पालक मुलींवर लग्नासाठी दबाव आणतात. दुसरीकडे काही समाजांत हुंडा नको; पण मुलीच्या अंगावर एवढे तोळे सोने घाला, लग्न थाटात लावून द्या, अशा छुप्या मार्गाने हुंडा घेतात. दुसरीकडे मात्र काही तरुण- तरुणींनी हुंडा न घेतादेखील लग्न केल्याची उदाहरणे आहेत; मात्र ती तुरळक आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्त्या लता भिसे यांनी व्यक्त केले.
हुंडा विरोधातील आमची चळवळ कधीही थांबली नाही. आज आपली पावले जागतिकीकरणाच्या दिशेने पडत आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक परिवर्तनाकडे आपणा सर्वांचेच दुर्लक्ष झाले. प्रत्यक्ष जीवनात विवाहप्रसंगी मुलीकडची बाजू कनिष्ठ आणि मुलाकडची बाजू श्रेष्ठ, असेच मानले जाते. लग्नात दोन्हीकडचा खर्च; तसेच दागदागिने, भेटवस्तू, मालमत्ता, वरदक्षिणा या आणि अशा अनेक मागण्या वरपक्षाकडून अटीच्या स्वरूपात केल्या जातात.
या सर्वांच्या विरोधात मुलींनी बोलले पाहिजे. तुझे मत, आवाज हे तुझे शस्त्र आहे. आणि त्या शस्त्राचा वापर करायला हवा. अत्याचाराविरोधात बोलले पाहिजे. माहेर हे मुलींचे हक्काचे घर आहे, त्यामुळे तिला तिच्या घरी येण्यास कोणीही प्रतिबंध करू शकत नाही. पालकांनी मुलींचे विचार व्यापक केले पाहिजे, असे मत स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या प्रतिमा परदेशी यांनी
व्यक्त केले. (प्रतिनिधी)