Anti-drug day; फक्त तीस टक्के तरूण व्यसनांपासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:12 PM2019-06-26T12:12:40+5:302019-06-26T12:15:20+5:30
अमली पदार्थविरोधी दिन : दररोजच्या जीवनात व्यसन करणाºयांचं प्रमाण ५0 टक्के
सोलापूर : उच्चभ्रू समाजात एक फॅशन म्हणून प्राशन केलेले अल्कोहोल, धकाधकीच्या जीवनात तणावातून मुक्ती मिळविण्यासाठी उपाय म्हणून सध्या लोकांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले आहे. समाजातील ७0 टक्के तरूणांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे. तसेच आयुष्यभरात कधीही कसलेही व्यसन न केलेल्या तरूणांचे प्रमाण फक्त १0 टक्के इतके आहे अशी माहिती या घटकांसोबत काम करणाºया संबंधित अधिकाºयांनी दिली.
ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते, त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) वगैरे पदार्थांचा मादक पदार्थांत समावेश केला जातो. ब्राऊन शुगर, झंडूबाम रुमालावर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात, यातून त्यांना नशा येते. स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जात आहे. यापुढेही जाऊन श्रीमंत लोक सिंथेटीक अंमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मॅफेड्रॉन) वापर होऊ लागला आहे. शिवाय मॅजिक मश्रूम, एलसीडी, मारिजुआना, म्याव-म्याव, डॅरनेक्स, शिलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाईटनर ते औषधे यांचाही वापर नशेसाठी केला जाऊ लागला आहे.
केवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे आज या गर्तेत आपोआपच सापडले जात आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच उच्चभ्रू वर्गातील लोकही यात गुरफटू लागले आहेत. सुरुवातीला कोणीही अमली पदार्थ व्यसनाधीन होण्यासाठी सेवन करीत नाही.
काही विद्यार्थी अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून सुरुवातीला अमली पदार्थांचे सेवन करतात. मुलीही अमली पदार्थांच्या विळख्यात अडकू लागल्या आहेत. बाजारात नशा आणणारे अनेक पदार्थ मिळतात. काही औषधांनीही नशा येते. काहीजण अमली पदार्थ शरीरात टोचून घेतात, पण कोणताही अमली पदार्थ हा शरीरासाठी घातकच आहे.
व्यसनांची लक्षणे...
- पॉकेटमनी वाढविण्यासाठी सतत पालकांकडे तगादा. घरातील वस्तू हळूहळू गायब होणे. जुने मित्र सोडून नवीन मित्र बनविणे. बाथरुममध्ये जास्त वेळ घालविणे. घरात इंजेक्शन अथवा सिरिंज आढळणे. डोळे लाल, निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे. वर्तणुकीत अचानक बदल घडतो. अमली पदार्थांचे सेवन करणाºया मुलांची शाळेत उपस्थिती कमी होऊ लागते. अभ्यासात, खेळ किंवा अन्य कार्यक्रमात त्यांचे मन लागत नाही. बोलताना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, व्यक्तिगत स्वच्छता, कपड्यांबद्दल बेफिकिरीने वागणे, निद्रानाश, व्यसनाचे परिणाम फुफ्फुस, स्मरणशक्ती, अवयव निकामी होणे, अस्वस्थता, मानसिक आजार वाढतात.
समाजात तसे पाहिले तर ९0 टक्के व्यसनाधिनतेचे प्रमाण आहे. ५0 टक्के लोक दररोज नित्यनियमाने अमली पदार्थांचे सेवन करतात. २0 टक्के लोक हे आठवड्यातून व १५ दिवसांतून अल्कोहोल प्राशन करतात. व्यसनापासून बाहेर पडणे शक्य आहे, त्यासाठी कौन्सिलिंग आणि योग्य औषधोपचार देणे आवश्यक आहे.
- डॉ. विलास पाटील, होमिओपॅथिक तज्ज्ञ