केंद्रातही जादूटोणाविरोधी कायदा लागू व्हावा! - श्याम मानव

By Admin | Published: June 20, 2017 05:10 PM2017-06-20T17:10:40+5:302017-06-20T17:10:40+5:30

काटेकोर अंमलबजावणी व व्यापक जनजागृती करण्यासोबतच जादूटोणाविरोधी कायदा आता केंद्रातही लागू व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Anti-superstition act should be implemented at the Center too! - Shyam Manav | केंद्रातही जादूटोणाविरोधी कायदा लागू व्हावा! - श्याम मानव

केंद्रातही जादूटोणाविरोधी कायदा लागू व्हावा! - श्याम मानव

googlenewsNext

अकोला : आघाडी सरकारच्या कार्यकाळात कार्यान्वित झालेली जादूटोणाविरोधी कायदा प्रचार, प्रसार, जनजागृती व अंमलबजावणी समिती भाजप सरकारच्या काळातही कार्यरत आहे. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या प्रशासन काळातील पकड युती सरकारमध्ये दिसून येत नाही. अंधश्रद्धेपोटी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी अधिक काटेकोर अंमलबजावणी व व्यापक जनजागृती करण्यासोबतच जादूटोणाविरोधी कायदा आता केंद्रातही लागू व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक व शासकीय समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
काँग्रेसच्या कार्यकाळात निर्माण झालेला हा कायदा सर्वसंमतीने पारीत करण्यासाठी विरोधी बाकावर असलेल्या भाजप व शिवसेनेनेही मदत केल्याचा श्याम मानव यांनी आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्राचा पाया पुरोगामी विचारांचा असल्याने येथे हा कायदा होऊ शकला. हा कायदा नागरिकांपर्यंत पोहचावा यासाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्हास्थळी जाहीर सभा झाल्या. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दक्षता अधिकारी नियुक्त असल्याने सर्व विभागात पोलिस मुख्यालयी अधिकार्‍यांचे सखोल प्रशिक्षणही घेण्यात आले; मात्र या कार्यात सातत्य ठेवण्यासाठी व्यापक प्रचार महत्वाचा ठरतो. अ. भा. अनिंसने आजतागायत कोणताही शासकीय अथवा विदेशी निधी स्विकारला नसून, कायद्याच्या प्रचारार्थ उपलब्ध झालेला निधीही प्रशासकीय स्तरावरच खर्च केल्या गेला असल्याचे प्रा. मानव यांनी सांगितले.
आज देशभरात कायदा लागू होण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे. त्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याचेही मानव यांनी सांगितले. राजकीय पक्षाचा याला विरोध नसतोच. सनातन संस्था सारख्या धर्मांध संघटना अन्य कट्टरवाद्यांना हाताशी घेऊन सतत अडसर निर्माण करीत असतात; मात्र दाभोळकर आणि पाणसरे यांच्या हत्या प्रकरणात सनातनची माणसे सापडल्याने सामाजिक पाठिंबा ते गमावून बसले आहेत, असे मानव म्हणाले. अंधश्रद्धा निर्मुलनाची ही चळवळ व उपक्रम आपल्या मृत्यूनंतरही सुरु राहावी यासाठी आपली स्थावर मालमत्ता अ.भा. अनिंसच्या सुपूर्द करीत असल्याचेही श्याम मानव यांनी जाहीर केले.
पत्रकार परिषदेला अ. भा. अनिंसचे राज्य प्रवक्ता पुरुषोत्तम आवारे पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख शरद वानखडे, अशोक घाटे, प्रा. स्वप्ना लांडे, महानगर संघटक चंद्रकांत झटाले, जिल्हा सचिव संतोषकुमार ताले पाटील यांची उपस्थिती होती.

Web Title: Anti-superstition act should be implemented at the Center too! - Shyam Manav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.