"इंदुरीकर महाराजांमध्ये विकृत लक्षणे दिसतात, ते कीर्तनातून अंधश्रद्धा पसरवतात!"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 03:22 PM2020-02-14T15:22:52+5:302020-02-14T15:56:47+5:30
सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक आणि टिकटॉकवरुन हा व्हिडीओ व्हायरल झाला असून गर्भलिंग निदान निवडीसंदर्भातील महाराजांच्या कीर्तनातील वक्तव्याला आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावरुन आता चांगलाच वाद पेटला असून महाराजांचे समर्थकही पुढे येत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी इंदुरीकर यांच्यात विकृत लक्षणे दिसतात असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी गर्भलिंग चाचणी कायद्याचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
अविनाश पाटील यांनी 'इंदुरीकर महाराज यांच्यात विकृत लक्षणे दिसतात. त्यांच्या कीर्तनाचा एक व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी संदेश दिला आहे. त्यांनी केलेले वक्तव्य संविधानविरोधी आणि अशास्त्रीय आहे. त्यांचे विधान पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन असून त्यांच्या कीर्तनातून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी वक्तव्ये दिसून येतात. महिलांची अवहेलना व द्बेष ते करतात' असं म्हणत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
गर्भलिंगनिदान प्रकरणी इंदोरीकर महाराजांना नोटीस https://t.co/ooxDxhtdqu
— Lokmat (@MiLOKMAT) February 13, 2020
इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावरुन महाराजांचे समर्थनही केले जात आहे. ''इंदुरीकर महाराज जे काही वाक्य बोलले, ते गुरुचरित्रात दिलेल्या 37 व्या अध्यायाच्या संदर्भाने... माहितीसाठी ओवी क्रमांक 51 पासून वाचून बघावं. महाराजांना बदनाम करून ज्याला मोठ व्हायचं असेल त्यांनी जरूर मोठ व्हावं. पण, महाराजांच वाक्य तोडून मोडून दाखवून फुकटची प्रसिद्धी घेऊ नये. महाराज कीर्तनात समाजप्रबोधन करतात. कित्येक तरुणांची व्यसनमुक्ती केली. गावागावातील वरती बंद करून कीर्तन चालू केली. अनाथ मुलांसाठी 10 वी पर्यंत मोफत शाळा चालवतात. राहिला प्रश्न महिलांचा तर, स्त्री भ्रूण हत्या, लेक वाचवा लेक शिकवा यांसारख्या विषयावर कीर्तनातून समाजप्रबोधन करतात. हवं तर तुम्ही पूर्ण कीर्तन बघू शकता.'' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, अनेकांनी आपल्या डीपीवर महाराजांचा फोटोही लावला आहे.
शिक्षक ते किर्तनकार
इंदुरीकर महाराज हे स्वत: जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांचे प्रेझेंटेशन आणि ज्ञान यांच्या जोरावर त्यांनी कीर्तन व प्रवचनाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात इंदुरीकर महाराजांनी खेड्यापाड्यात सायकलवर जाऊन कीर्तनाची सुरुवात केली. त्यांच्या कीर्तनाला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळायचा, त्यामुळे त्यांच्या किर्तनाचा गावागावात तोंडी प्रसार झाला. 2000 रोजी इंदुरीकरांच्या कीर्तनाची पहिली कॅसेट रेकॉर्ड करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे 2 तासात 1 हजार कॅसेट विकल्या गेल्या. त्यानंतर, राजकीय नेते आणि गावातील पुढाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजांच्या कीर्तनाचा आयोजन करण्यात येऊ लागला. जसा काळ बदलला तसं महाराजांच्या कीर्तनाचं माध्यमही बदलत गेलं. महाराजांनी काळाप्रमाणे स्वत:ला अपडेट केलं, पण आजही त्यांच्या कीर्तनातील भाषा, शैली आणि कंटेंट हा ग्रामीण भागातल्या बोलीचाच आहे. त्यामुळेच, युट्युबवरील त्यांची भाषण जगभरातील मराठी लोकांपर्यंत पोहोचत आहेत. युट्युबवर आणि सोशल मीडियावर त्यांच्या फोलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Pulwama Attack : शहिदांसाठी मोठं योगदान; माती गोळा करण्यासाठी झटला मराठमोळा तरुण
Raj Thackeray: 'हिंदूजननायक' उपाधीवर राज ठाकरेंनी हातच जोडले, जरा चिडूनच म्हणाले...
पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल
Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्य