नमन सादरीकरणातून पोलिसांची दहशतवादविरोधी जनजागृती

By admin | Published: May 22, 2015 10:27 PM2015-05-22T22:27:33+5:302015-05-23T00:36:31+5:30

वरवेली येथील नवतरुण नमन मंडळाच्या बहुरंगी--गावागावातून जनजागृती मोहीम यशस्वी

Anti-terrorism publicity of police from Naman | नमन सादरीकरणातून पोलिसांची दहशतवादविरोधी जनजागृती

नमन सादरीकरणातून पोलिसांची दहशतवादविरोधी जनजागृती

Next

गुहागर : देशातील काही मोठ्या दहशतवादी कारवायांमध्ये अतिरिक्यांनी समुद्रामार्गे घुसखोरी करुन हाहाकार माजवला होता. हे लक्षात घेऊन कोकणची प्रमुख लोककला असलेल्या नमन नाट्यकलेतून समुद्र किनारपट्टीवरील गावांमध्ये जनजागृती करण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम गुहागर पोलिसांकडून राबवण्यात येत आहे. वरवेली येथील नवतरुण नमन मंडळाच्या बहुरंगी सादरीकरणातून गावागावातून जनजागृती मोहीम यशस्वी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गुहागर तालुक्याला सुमारे ४० किलोमीटर लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे किनारपट्टीचे संरक्षण हे गुहागर पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे. गावागावांतून दक्षता समिती सागररक्षक दलांची स्थापना करण्यात येते. मात्र, सर्वसामान्य जनतेपर्यंत आपल्या सुरक्षिततेबाबत जागृती होणे गरजेचे आहे. त्यातील जिज्ञासुवृत्तीत वाढ होऊन पोलीस नागरिकांत मित्रत्त्वाचे नाते निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अतिरेकी कारवायांमध्ये होणारा सागर किनारपट्टीचा वापर याबाबत वेलदूर, आसगोली, वेळणेश्वर, पालशेत, बुदल, नरवण आणि तवसाळ या किनारपट्टीवरील प्रमुख गावांमध्ये ‘मानवी रक्षक, मानवी भक्ष्यक’ या वगनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने नमनाला ग्रामीण जनतेची गर्दी होत आहे. गण (गणेश वंदना), गवळण, संकासूर आणि पाठोपाठ मानवी रक्षक, मानवी भक्ष्यक हे वगनाट्य सादर करण्यात येत आहे. चार दहशतवाद्यांना गावातील एकजण पैशांच्या मोहापायी आसरा देतो.
वगनाट्यातून सरळ वाटणाऱ्या घटनांकडे बारकाईने पाहिले असता, आपण संभाव्य दुर्घटना वाचवू शकतो. अनोळखी व्यक्तिंना चुकीची मदत करु नका, संशयास्पद घटनांकडे गांभिर्याने पाहून पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, उपनिरीक्षक एम. बी. यादव, महेश टेमकर, आशिष बल्लाळ यांनी हा उपक्रम यशस्वी केला. वरवेली येथील नवतरुण नमन मंडळाच्या कलाकारांचे ही संकल्पना यशस्वी करण्यात मोठे योगदान आहे. (वार्ताहर)

Web Title: Anti-terrorism publicity of police from Naman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.