मॅपल ग्रुपच्या सचिन अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Published: April 28, 2016 04:12 PM2016-04-28T16:12:52+5:302016-04-28T16:12:52+5:30
स्वस्तात घर देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याचे छायाचित्र वापरून जाहिरात करणाऱ्या मॅपल ग्रुपचे संचालक सचिन अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी पुण्यातील सत्र न्यायालयाने फेटाळला
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे. दि. २८ - स्वस्तात घर देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याचे छायाचित्र वापरून जाहिरात करणाऱ्या मॅपल ग्रुपचे संचालक सचिन अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी पुण्यातील सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे आता सचिन अग्रवाल यांना पोलीस कधी अटक करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सचिन अग्रवाल यांनी आपल्या मॅपल ग्रुपतर्फे पुण्यात पाच लाखांत घर देण्याची योजना जाहीर केली होती. घरासाठी अर्ज करणाऱ्यांकडून ना परतावा स्वरूपात ११४५ रुपये रोख घेतले जात होते. सोडत गपद्धतीने प्रधानमंत्री आवास योजनेच्या १० हजार लाभार्थ्यांना पाच लाखांत तर अन्य लोकांना सात लाख ते आठ लाखांत वन बीएचके घर देण्याची योजना मॅपल ग्रुपने जाहीर केली होती. मात्र ही योजना फसवी असल्याचा दावा करीत खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती.
या योजनेचा प्रधानमंत्री आवास योजनेशी काहीही संबंध नसल्याने ती त्वरित बंद करावी तसेच या प्रकरणाची म्हाडाच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी असे आदेश महाराष्ट्र प्रधानमंत्री आवास योजनेचे राज्य संचालक निर्मलकुमार देशमुख यांनी म्हाडास दिले आहेत. त्यानंतर राज्य सरकारने मॅपल ग्रुपवर कारवाई आश्वासन देत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच अर्जदारांचे पैसे परत करण्याचे आदेशही दिले होते. या प्रकरणात अद्याप सचिन अग्रवाल यांना अटक झालेली नाही. काही दिवसांपूर्वी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलिसांदेखत सचिन अग्रवाल पळून गेल्याने नवा वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर सचिन अग्रवाल यांच्या वकिलांकडून न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. तो फेटाळण्यात आला.