अनुपम खेर तर भाजपाचे प्रवक्ते! विद्यार्थ्यांचा आरोप : नियुक्तीवरून कहीं खुशी, कहीं गम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:28 AM2017-10-12T03:28:51+5:302017-10-12T11:31:10+5:30
प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी चित्रपटसृष्टीत विविधांगी अभिनयातून ठसा उमटवला आहे. चित्रपट क्षेत्रातील अनुभव दांडगा असल्याने एफटीआयआयच्या चेअरमनपदी त्यांच्या झालेल्या नियुक्तीला आमचा आक्षेप नाही.
पुणे : प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी चित्रपटसृष्टीत विविधांगी अभिनयातून ठसा उमटवला आहे. चित्रपट क्षेत्रातील अनुभव दांडगा असल्याने एफटीआयआयच्या चेअरमनपदी त्यांच्या झालेल्या नियुक्तीला आमचा आक्षेप नाही. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये त्यांनी केलेली पुरस्कार वापसी, असहिष्णुता याबाबतची वादग्रस्त वक्तव्ये पाहता ते भाजपाचे प्रवक्ता आणि हिंदू राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते असल्याचे वाटते, असे सांगत एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनच्या पदाधिका-यांनी ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
गजेंद्र चौहान यांची चेअरमनपदी निवड झाल्यावर एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनने दोन वर्षांपूर्वी आंदोलन केले होते. ते दडपण्यासाठी शासनाने साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा अवलंब केला. तरीही, विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या नियुक्तीवरून वातावरण धुमसत होतेच; या सर्व आंदोलनाचा परिणाम म्हणून चौहान यांना सूत्रे हातात घेण्यासच विलंब लागला आणि केवळ दीड वर्ष त्यांना हे पद भूषवता आले. त्यानंतर सहा-सात महिन्यांपासून हे पद रिक्तच होते.
मंगळवारी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने अनुपम खेर यांची चेअरमनपदी नियुक्ती झाल्याची घोषणा केली. त्यांची ही नियुक्ती स्टुडंट असोसिएशनसाठी धक्का देणारी नसून, हे गृहीतच होते, असे सांगत सरचिटणीस रोहित कुमार म्हणाला, ‘खेर यांच्या योग्यतेबाबत कोणतीही शंका नाही. मात्र, त्यांच्या पत्नी किरण खेर या भाजपाच्या खासदार आहेत. याशिवाय त्यांनी भाजपाला पूरक अशा भूमिका मांडल्या आहेत. खेर मुंबईमध्ये स्वत:चे अॅक्टिंग स्कूल चालवतात. त्यामुळे शासकीय संस्थेवर शासनाने त्यांची नियुक्ती का केली, यातील हितसंबंध नेमके काय आहेत, असा प्रश्न पडतो.
पाच विद्यार्थ्यांना नोटीस-
एफटीआयआयमध्ये विद्यार्थी आणि प्रशासनात पुन्हा धुमशान सुरू झाले आहे. फिल्म मेकिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पूर्व निर्मिती बैठकीवर बहिष्कार टाकल्याने पाच विद्यार्थ्यांना तीन दिवसांत वसतिगृह रिकामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तिसरे सत्र होईपर्यंत संस्थेच्या आवारात थांबण्याची गरज नाही, असे विद्यार्थ्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे, असे स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष रॉबिन जॉय याने सांगितले.