राज्यात रुग्णवाढीने चिंता, दिवसभरात ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान; अमरावती, अकोला जिल्ह्यांत संचारबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 03:31 AM2021-02-19T03:31:23+5:302021-02-19T06:30:17+5:30
CoronaVirus News in Maharashtra : विदर्भातील रुग्णसंख्येत अचानक २० टक्के वाढ झाल्याचे आढळले आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शेकडो विवाह झाले, त्यामुळे या भागात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली, असा प्राथमिक अंदाज आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाची राज्यातील दैनंदिन रुग्णवाढ चिंताजनक बनली आहे. गुरुवारी ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३८ मृत्यूंची नोंद झाली. बुधवारी ४,७८७ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती व अकोला जिल्ह्यात शनिवार, रविवार असे दोन दिवस संचारबंदी लागू केली जाणार आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश काढण्यात आला असला तरी प्रत्यक्षात जमावबंदी असेल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विदर्भातील रुग्णसंख्येत अचानक २० टक्के वाढ झाल्याचे आढळले आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शेकडो विवाह झाले, त्यामुळे या भागात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली, असा प्राथमिक अंदाज आहे. अकोला जिल्ह्याचा कोरोना रुग्णसंख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा ३२ टक्के असून, अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ४८ टक्के आहे, तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर १५ टक्के आहे. संपूर्ण राज्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा ८.८ टक्के एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.४८ टक्के एवढा आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुका, अमरावती महापालिका क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद आणि पांढरकवडा नगरपरिषद क्षेत्र, अकोला जिल्ह्यातील अकोट व मूर्तिजापूर तालुका आणि अकोला महापालिका क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
अमरावती जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले आले. शनिवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३६ तासांसाठी ही संचारबंदी लागू असेल. यवतमाळमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. गुरुवारी रात्रीपासूनच हे आदेश लागू करण्यात येत आहे.
मागील सात दिवसात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांपैकी नागपूर व वर्धा जिल्ह्यांत रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. नागपूर जिल्ह्यात ३,७८०, तर वर्धा जिल्ह्यात ५०३ रुग्णांची नोंद झाली. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यांत रुग्ण वाढत आहेत.
तीन जिल्ह्यांत आढळला कोरोनाचा वेगळा जीन !
अमरावती, सातारा आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांतील प्रत्येकी चार कोरोना रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
त्यापैकी सहा रुग्णांचे जीन आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोना जीनपेक्षा वेगळे दिसून आले आहेत. त्यावर आणखी संशोधन सुरू आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. अमरावती येथील पाच रुग्णांचे स्वॅबदेखील पुण्याच्या एनआयबी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
मुंबईत पालिकेची कारवाईची लस
काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी मुंबई पालिकेने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
दुसरी लाट नव्हे; पण काळजी घ्या!
राज्यातील रुग्णवाढ ही कोरोनाची दुसरी लाट नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यासह मुंबईत झालेली रुग्णवाढ स्थानिक पातळीवरील आहे.
सहवासितांचा शोध आणि निदान या दोन सूत्रांद्वारे हा संसर्ग आटोक्यात आणता येऊ शकतो, अशी माहिती डॉ. सुभाष साळुंके यांनी दिली.
चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे पुढील दोन आठवड्यांपर्यंत रुग्णसंख्येचा आलेख वाढताना दिसून येईल. कोणत्याही साथीच्या आजारात अशा प्रकारचे चढ-उतार येत असतात, असेही त्यांनी नमूद केले.
आपल्या देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग ब्राझील आणि साउथ आफ्रिकन देशातील व्हायरस एवढा नाही. त्या देशातील व्हायरस ७० टक्के संसर्गजन्य आहे. रुग्णांनी आणि जनतेने घाबरण्याची गरज नाही. मात्र विनामास्क फिरणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण आहे हे लक्षात ठेवावे.
- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण