कोणत्याही क्षणी कोसळतील कडे!

By admin | Published: June 25, 2015 11:32 PM2015-06-25T23:32:11+5:302015-06-25T23:32:11+5:30

‘डोंगरांचा जिल्हा’ निद्रिस्त : तज्ज्ञांच्या समितीकडून ‘भूस्खलनप्रवण’ टापूंचे सर्वेक्षण अत्यावश्यक

At any moment collapsed! | कोणत्याही क्षणी कोसळतील कडे!

कोणत्याही क्षणी कोसळतील कडे!

Next

राजीव मुळ्ये - सातारा -पावसाळा सुरू झाला की घाटात दरड कोसळणे, वाहतूक ठप्प होणे, क्वचितप्रसंगी वाहनावर दगड पडून जीवितहानी हे प्रकार नित्याचेच. परंतु ते कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांची सुरुवातही अद्याप झालेली नाही. विज्ञानाच्या साह्याने निसर्गाला आव्हान देऊन विकास साधताना निसर्ग हेही एक ‘विज्ञान’ आहे याचा विसर पडल्याने ही परिस्थिती ओढवली असून, तज्ज्ञांच्या मदतीने वेळीच उपाय न शोधल्यास मोठ्या जीवितहानीस सामोरे जावे लागण्याचा दिवस दूर नाही. साताऱ्यासारखा ‘डोंगरांचा जिल्हा’ हा महाभयानक धोका दुर्लक्षित करतो आहे.
अभियांत्रिकी कौशल्याने डोंगरी भागातून रस्ते काढून आपण विकास साधला, उंच डोंगरांवर इमारती उभारल्या; परंतु भूरूपशास्त्र आपण नेहमीच दुर्लक्षित केले आहे. भूरूप प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते आणि त्याकडे डोळेझाक केली की अरिष्ट ओढवते. ‘दरड कोसळणे’ हे असेच अरिष्ट होय. जागतिक हवामानबदलाचा परिणाम म्हणून पावसाळ्यातील एकंदर पाऊस कमी होऊन एकाच वेळी अधिक पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. हे पाणी डोंगरावरून वेगाने खाली येते. वृक्षराजी कमी झाल्याने मातीची धूप वाढली आहे. परिणामी खडकांना एकमेकांशी बांधणारे दुवे कमकुवत होऊन दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.
सातारा जिल्हा पश्चिम घाटाच्या छायेत वसलेला असून, जिल्ह्यात घाटरस्तेही भरपूर आहेत. प्रत्येक पावसाळ्यात कोठे ना कोठे दरड कोसळतेच. तथापि, ‘आपत्ती व्यवस्थापन’ एवढाच विषय अशा वेळी डोळ्यांसमोर येतो. त्याचेही नियोजन गरजेनुसार होत नाही. खरे तर दरड कोसळण्याच्या घटनेचे पूर्वानुमान शक्य आहे. तसेच हा धोका टाळण्यासाठी काही उपायही आपल्या हातात आहेत. तथापि, निसर्गाला ‘शास्त्र’ म्हणून स्वीकारणारा दृष्टिकोन त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे असायला हवा, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. दरड कोसळू नये म्हणून काही ठिकाणी तात्पुरते तर काही ठिकाणी कायमस्वरूपी उपाय करणेही शक्य असून, प्रशासनाने त्यासाठी भूरूपतज्ज्ञांची समिती नेमून तातडीने सर्वेक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे ‘विकास’ या एकाच शब्दामागे लपून निसर्गाला आव्हान देण्याच्या प्रयत्नांकडे डोळेझाक करता येणार नाही, असा इशाराही तज्ज्ञ देतात. डोंगराळ भागातील सपाटीकरणाच्या, कडे तोडण्याच्या प्रकारांना तातडीने आळा बसण्याची गरज ते व्यक्त करतात.


असा आहे आपला सह्याद्री
सह्याद्री पर्वत अग्निजन्य खडकांचा बनलेला आहे. अनेक ज्वालामुखी होऊन थरावर थर जमून सह्याद्री बनला आहे. सुमारे दोन किलोमीटर जाडीच्या भूगर्भरचनेत असे एकंदर २९ थर पाहायला मिळतात. प्रत्येक दोन थरांच्या मध्ये एक ते दोन मीटर जाडीचे लाल मातीचे आवरण (रेड बोला) आहे. ही माती या २९ थरांना एकमेकांशी पक्के बांधून ठेवते.


अशी कोसळते दरड
प्रत्येक ठिकाणचे भूरूप त्या-त्या ठिकाणच्या नैसर्गिक स्थितीनुसार बनलेले असते. आपल्याकडील भूरूप जमिनीच्या झिजेमधून तयार झालेले आहे. झिजेचेही अनेक प्रकार आहेत. सह्याद्री पट्ट्यातील झीज प्रामुख्याने नैसर्गिक उतारावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे झालेली आहे. झिजेमुळे ‘ब्लॉक वेस्टिंग’ (मोठ्या शिळेच्या आसपास झीज होऊन त्या शिळेचा आधार तुटण्याची प्रक्रिया) घडून येते आणि ती शिळा कोसळते. त्यालाच आपण दरड कोसळणे असे म्हणतो.


कडे कापून रस्ते रुंद करणे घातक असते. डोंगराळ भागात विकासकामे करताना ‘इकॉलॉजिकल’ आणि ‘जिओलॉजिकल इंजिनिअरिंग’चा विचार करायला हवा. भूगर्भरचना समजावून घ्यायला हवी. हे काम सोपे नाही. परंतु संवेदनशील प्रशासन यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करू शकते. हे तज्ज्ञही ‘नावाचे’ नसावेत. आत्मीयतेने या कामासाठी वेळ देणारे तज्ज्ञ नेमून प्रशासनाने कडे आणि घाटरस्त्यांचे सर्वेक्षण करावे.
- प्रा. एम. के. गरुड, भूरूपतज्ज्ञ


कोसळणाऱ्या शिळा थोपवू या
डोंगराळ भागात माथा ते पायथा टप्पे करून वनीकरण
प्रत्येक टप्प्यावरील झाडांचे प्रकार निसर्गनियमानुसार
सुटलेल्या कड्यांची पाहणी करून गरजेनुसार दरजांचे सिमेंटीकरण
सिमेंटीकरण अशक्य असेल अशा ठिकाणी गॅबियन जाळ्या
घाटरस्ते रुंद करण्यापूर्वीच भूरचनाशास्त्राचा विचार


तातडीच्या उपाययोजना
जिल्हास्तरावर भूरूपतज्ज्ञांच्या समितीची स्थापना करून पाहणी
दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचा शोध घेणे
त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार आपत्ती टाळण्याचे उपाय
डोंगराळ भागातील प्रकल्पांना तज्ज्ञांच्या पाहणीनंतरच परवाना
कमीत कमी खोदाई, सपाटीकरण; अवजड यंत्रसामग्री टाळणे
डोंगराळ भागात विहिरी, विंधनविहिरींची संख्या आटोक्यात ठेवणे

Web Title: At any moment collapsed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.