बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का?
By Admin | Published: May 27, 2016 04:42 AM2016-05-27T04:42:41+5:302016-05-27T04:42:41+5:30
भाजपाचे मंत्री सतत आरोपांच्या घेऱ्यात आहेत; मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांवर आरोप होत नाहीत, या आक्षेपावर उत्तर देताना ‘आंब्याच्या झाडाला तर सगळेच दगड मारतात, पण बाभळीच्या
मुंबई : भाजपाचे मंत्री सतत आरोपांच्या घेऱ्यात आहेत; मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांवर आरोप होत नाहीत, या आक्षेपावर उत्तर देताना ‘आंब्याच्या झाडाला तर सगळेच दगड मारतात, पण बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का? अशा मिश्कील शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला काटा टोचला.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खा. दानवे यांनी आज लोकमत कार्यालयास भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. आपल्या उत्तराचा अधिक विस्तार करत ते पुढे म्हणाले, राज्यात युतीचे सरकार असले तरी बहुतेक कॅबिनेट मंत्रिपदे आमच्याकडे आहेत. शिवाय, भाजपाचे मंत्री निर्णयक्षम आहेत. त्यामुळे आरोप तर होणारच. पण कोणताही आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. भाजपा-शिवसेनेत सध्या वाघ-सिंहावरून सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावरही दानवे यांनी भाष्य केले. शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका छायाचित्राचा हवाला देत ‘वाघाच्या घुहेत सिंह घुसणार का?’ असे विचारले असता ते म्हणाले, कोण वाघ, कोण सिंह हे विधानसभा निवडणुकीत सिद्ध झाले आहे. राजकारणात कोणीही कायम ‘वाघ’ नसतो. सिंहाचा वाघ होऊ शकतो अन् वाघाचा उंदीरदेखील होऊ शकतो, हा राजकारणातील अनुभव आहे. वाघ कोण आणि सिंह कोण, हे जनता ठरवते आणि पुढेही ठरवेल, असे सूचक विधान करत दानवे यांनी भाजपाच्या आगामी रणनीतीचे सूतोवाच केले. शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपाला रोज झोडपण्याचे काम सुरू आहे. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ते त्यांचे पूर्वापार धोरण आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनाही ते सोडत नव्हते! आम्ही मातोश्रीवर गेलो, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, पण काही फरक पडला नाही. त्यांच्या मनात नेमकं काय आहे, हे ते कधीच सांगत नाहीत, अशी हतबलता दानवे यांनी व्यक्त केली.
आगामी महापालिका, नगरापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजपा-शिवसेनेने युती करूनच लढवाव्यात असे आमचे मत आहे. युतीबाबतचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने दोन वर्षांत केलेली कामगिरी, दुष्काळ निवारणासह विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात दिलेला निधी, नितीन गडकरींसह महाराष्ट्रातील केंद्राच्या प्रत्येक मंत्र्याने दिलेले मोठे योगदान यातून केंद्र-राज्य संबंधांचा नवा अध्याय सुरू झाला असून मोदी सरकारला पाच वर्षे पूर्ण होताना त्याची फळे राज्याला नक्कीच मिळतील, असा दावा दानवे यांनी केला.
सरकार आणि पक्षात समन्वय, १ कोटी ५ लाख सदस्य बनविणे, दुष्काळग्रस्त भागात पक्षाची संपूर्ण यंत्रणा उतरविणे यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण भर दिला, असे त्यांनी नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)
मंत्री व्हायला आवडेल!
आपल्याला केंद्रात पुन्हा मंत्री म्हणून जायला आवडेल का? यावर ते म्हणाले, मला मंत्रिपद नको असे मी म्हणणार नाही, पण पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीवर मी खूश आहे. राजकारणात जी भूमिका मिळते त्यात रंगून जाणारा मी माणूस आहे. यदाकदाचित पुढे वेगळी भूमिका मिळाली तर तीही तितक्याच आनंदाने स्वीकारेन.
दूध कुठे घालणार?
सरकारने दूध खरेदी करावे, असे अजित पवार म्हणत आहेत. पण अजितदादा, मधुकर पिचड, बाळासाहेब थोरात यांनीच सहकारी दूध संघ लिलावात विकत घेतले आहेत. सरकार दूध खरेदी करेल पण ते तुमच्या डेअरीत घालायचे का, असा सवाल दानवे यांनी केला.