गोळीबारामागे कुणाची चिथावणी?
By admin | Published: May 5, 2015 01:32 AM2015-05-05T01:32:05+5:302015-05-05T01:32:05+5:30
वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांच्या हत्येसाठी साहाय्यक फौजदार दिलीप शिर्के यांना कोणी उसकावले होते का, असा प्रश्न गुन्हे शाखेला पडला
जयेश शिरसाट, मुंबई
वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांच्या हत्येसाठी साहाय्यक फौजदार दिलीप शिर्के यांना कोणी उसकावले होते का, असा प्रश्न गुन्हे शाखेला पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गुन्हे शाखेकडून शिर्केचे कॉल डिटेल्स तपासले जाणार आहेत. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांकडेही चौकशी केली जाणार आहे.
२ मेला रात्री आठच्या सुमारास वाकोला पोलीस ठाण्यात हा थरार घडला. या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे आहे. वाकोला पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबातून नेमकी घटना गुन्हे शाखेने समजावून घेतली आहे. आदल्या दिवशी रात्रपाळीत असलेले शिर्के नेमून दिलेल्या पॉइंटवर उपस्थित नव्हते म्हणून त्यांची गैरहजेरी नोंदविण्यात आली होती. २ मे रोजी रात्रपाळीत आलेल्या शिर्केना ही बाब समजली. ते संतापले आणि तडक जोशींच्या केबीनमध्ये शिरले. त्यांनी जोशींसोबत वाद घातला, तेव्हा जोशींनी त्यांना अनुपस्थित असल्याबद्दल जाब विचारला. या वादानंतर केबीनबाहेर पडलेल्या शिर्केने पॉइंटवर जाण्याच्या निमित्ताने शस्त्रागारातून सर्व्हिस रिव्हॉल्वर घेतली. तेवढ्यात जोशी घरी जाण्यासाठी केबीनबाहेर पडले. त्याचवेळी शिर्केने त्यांच्यावर पाठीमागून दोन गोळ्या झाडल्या.
वाद झाला तेव्हा जोशींच्या केबीनमध्ये काही अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या जबाबातून दोघांमधला वाद सौम्य होता. दोघांपैकी कोणीही अर्वाच्च भाषा वापरली नव्हती. केबीनबाहेर असलेल्यांना तर या वादाची माहितीही नसावी, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की, वाद घातल्यानंतर लगेचच शिर्केने गोळीबार केलेला नाही. वाद घातल्यानंतर केबीनबाहेर पडलेल्या शिर्केने १५ ते २० मिनिटांनंतर जोशींवर गोळी झाडली. शिर्के रागाच्या भरात होता, तर मग त्याने इतका वेळ संयम कसा राखला? एखाद्याचा राग शांत होण्यासाठी २० मिनिटे पुरेशी असतात. त्याला विचार करण्याची संधी मिळते. तो आपला इरादा बदलू शकतो. त्यामुळे या २० मिनिटांमध्ये कोणी शिर्केचे कान भरले का, कोणी चिथावणी दिली का, असा प्रश्न गुन्हे शाखेला पडला आहे.
विशेष म्हणजे आदल्यारात्री अडीज वाजता शिर्के पॉइंटवर अनुपस्थित असल्याने नाइट इन्चार्ज एपीआय शिंदे यांनी तशी पोलीस ठाण्याच्या डायरीत नोंद केली. या नोंदीची माहिती शिर्केला पोलीस ठाण्यातल्याच कोणीतरी पुरवली. त्यामुळेच शिर्केने लगोलग शिंदे यांना फोन केला आणि मी जेवायला बाजूला गेलो होतो, अशी सबब दिली होती. त्यानंतर पहाटे सहा वाजता गस्तीवर असलेल्या शिंदेंना शिर्के पॉइटवर दिसला नाही.
त्या रात्री शिर्के कुठे होता, ते पॉइंटवर होता का, गोळीबाराआधीच्या २० मिनिटांमध्ये शिर्केने कोणाशी संपर्क साधला होता का, हे जाणून घेण्यासाठी गुन्हे शाखा त्यांचे कॉल डिटेल्स, टॉवर लोकेशन तपासणार आहे. याशिवाय त्यांच्या सहकाऱ्यांकडेही चौकशी करणार आहे.
याशिवाय गुन्हे शाखेकडून शिर्केबद्दलची बारीकसारीक माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. प्राथमिक चौकशीतून पूर्वी शिर्के वाकोला पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात नेमणुकीस होता. मात्र विरोधात झालेल्या तक्रारी आणि त्यांच्या तापट स्वभावामुळे त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.
त्याचे सहकारी-वरिष्ठांशी असलेले संबंध, पोलीस ठाण्यातला आणि पोलीस ठाण्याबाहेरचा वावर या प्रत्येक मुद्द्यावर गुन्हे शाखा त्यांची माहिती घेत आहे.