साडी शिवाय महिलांना मंदिरात प्रवेश नाही, अंबाबाई देवस्थानचा नवा निर्णय
By admin | Published: April 12, 2016 05:59 PM2016-04-12T17:59:18+5:302016-04-12T17:59:18+5:30
महिलांना गाभाराप्रवेश मिळू नये यासाठी मंदिर समितीने नव्या अटी टाकायला सुरुवात केली आहे. साडीमध्ये असलेल्या स्त्रीयांना गाभाराप्रवेशाची अट टाकण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १२ - पंजाबी ड्रेसवर आलेल्या महिलेला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही असा फतवा अंबाबाई देवस्थानने काढला असल्याचे वृत्त जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने दिले आहे. दवेस्थानच्या या निर्णयामुळे सोमवारी महिलांनी केलेल्या गाभाराप्रवेशाचा आनंद क्षणभंगूर ठरला आहे.
महिलांना गाभाराप्रवेश मिळू नये यासाठी मंदिर समितीने नव्या अटी टाकायला सुरुवात केली आहे. साडीमध्ये असलेल्या स्त्रीयांना गाभाराप्रवेशाची अट टाकण्यात आली आहे. भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांना जुना राजवाडा पोलिसांनी तशा सूचना केल्याची वृत्त आहे.
दवेस्थानच्या या निर्णयावर तृप्ती देसाई यांनी तीव्र शद्बात नाराजी व्यक्त केली आहे. पंजाबी ड्रेसमध्ये महिलांचे कोणत्याही प्रकारे अंग प्रदर्शन होत नाही. असे असताना पंजाबी ड्रेसवर आक्षेप का? असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे. तसेच मी आता पंजाबी ड्रेस घालूनच गाभार प्रवेश करणार असे आव्हान तृप्ती देसाई यांनी दिले आहे.
साडी हा महिलांचा पारंपारिक वेष आहे. यामुळे महिलांनी साडी घालून दर्शनाला यावे अशा सूचना आम्ही केल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल देशमुख यांनी सांगीतले.