एपीएमसीत पेट्रोल पंपाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2016 02:44 AM2016-11-05T02:44:53+5:302016-11-05T03:06:34+5:30
किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला मारहाण करून तोडफोड करणाऱ्यांना एपीएमसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली
नवी मुंबई : किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला मारहाण करून तोडफोड करणाऱ्यांना एपीएमसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. अटक केलेले पाचही तरुण तुर्भे गावचे राहणारे आहेत. गुरुवारी रात्री त्याठिकाणी हा प्रकार घडला होता.
एपीएमसी येथील इंडियन आॅइल पेट्रोल पंपाच्या ठिकाणी गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. तुर्भे गावातील दोघे तरुण दुचाकीवरून त्याठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आले होते. यावेळी पेट्रोल भरल्यानंतर पैसे देण्यावरून त्यांचा पेट्रोल पंपावरील कामगारासोबत वाद झाला होता. परंतु त्याठिकाणी उपस्थित मॅनेजरने प्रकरण मिटवून तरुणांना परत पाठवले होते. मात्र काही वेळाने ते दोघे त्यांच्या इतर सहकाऱ्यांना घेवून पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आले. त्यांनी मॅनेजरच्या केबिनवर दगडफेक करत मारहाण करून पळ काढला होता.
या प्रकाराची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथम हा प्रकार दरोड्याच्या प्रयत्नातून झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी शीघ्र गतीने तपासाला सुरवात करून अवघ्या दोन तासांत तुर्भे गावातून पाच जणांना अटक केली. चौकशीत त्यांनी पेट्रोल भरण्यावरून झालेल्या वादात त्याठिकाणी तोडफोड केल्याचे स्पष्ट झाले. अशोक सवादकर (१९), गणेश राजपुरे (१९), मनोज नावडकर (२३), स्वप्निल जाधव (२३) व भूषण बामणे (२१) अशी त्यांची नावे आहेत. बामणे हा कोपरखैरणेचा तर इतर सर्व जण तुर्भे गावातील राहणारे आहेत. (प्रतिनिधी)