जीएसटीविरोधात एपीएमसी राहणार बंद
By admin | Published: June 30, 2017 01:31 AM2017-06-30T01:31:38+5:302017-06-30T01:31:38+5:30
जीवनावश्यक वस्तूंचाही जीएसटीमध्ये समावेश केल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी ३० जूनला एक दिवसीय बंदचे आयोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचाही जीएसटीमध्ये समावेश केल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी ३० जूनला एक दिवसीय बंदचे आयोजन केले आहे. मसाला व धान्य मार्केटमधील सर्व व्यवहार बंद ठेवून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला जाणार आहे.
भारतीय उद्योग व्यापार मंडळाने जीएसटीमधील जाचक तरतुदीविरोधात ३० जूनला भारत बंदचे आयोजन केले आहे. या बंदला नवी मुंबईमधील मसाला व्यापाऱ्यांची संघटना नवी मुंबई मर्चंट चेंबर व धान्य व्यापाऱ्यांना ग्रोमा संघटनेने पाठिंबा दिला आहे. अन्न-धान्य, मसाल्याचे पदार्थ, सुका मेवा विकणारे व्यापारी बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
शासनाने किराणा व कृषी मालाच्या ब्रँडेड मालावर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येऊन महागाई वाढण्याचा धोका निर्माण होणार आहे. शासनाने अन्न-धान्य, मसाल्याच्या पदार्थावरील ५ टक्के जीएसटी रद्द करावा व सुकामेवा व खाद्यान्नावरील १२ ते १८ टक्के कर रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असून, त्यासाठी एकदिवसाचा बंद आयोजित केल्याची माहिती नवी मुंबई मर्चंट चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणा व ग्रोमाचे अध्यक्ष शरद मारू यांनी दिली आहे.