नवीन मतदारांच्या जागृतीसाठी ‘अॅप’
By admin | Published: September 28, 2016 10:49 PM2016-09-28T22:49:39+5:302016-09-28T23:06:33+5:30
सोशल मीडिया : ‘फेसबुक’च्या स्क्रीनवरही येणार संदेश
शोभना कांबळे -- रत्नागिरी --नव्या मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी आता राज्य निवडणूक आयोगाकडून मोबाईल अॅप तसेच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. यामुळे नव्या मतदारांमध्ये आपण मतदारयादीत नाव नोंदणी करणे गरजेचे असल्याची जाणीव निर्माण होण्यास मदत होणार आहे. अजूनही मतदारांना मतदानाचे महत्व कळत नसल्याने निवडणुकीच्या वेळी मतदानाची आकडेवारी म्हणावी तशी वाढलेली नाही. त्यामुळे योग्य उमेदवार निवडून येण्यात अडचण येत आहे. मतदानाची आकडेवारी वाढण्यात नव्या मतदारांची नोंद मतदार यादीत होणे गरजेचे आहे. मात्र, अजूनही त्यांच्यात याबाबत उदासीनता दिसून येते. त्यामुळे आता नव्या मतदारांना मतदानाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे लवकरच मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आकाशवाणीवरील मुलाखतीत ही माहिती दिली. या अॅपच्या माध्यमातून मतदाराचे नाव मतदार यादीत आहे का, असेल तर कुठल्या यादीत आदी माहिती मिळू शकणार आहे. त्यायोगे त्यात बदल करण्याची गरज असेल तर ती संबंधित तहसील कार्यालयात करता येऊ शकेल.
तसेच फेसबुक, टिष्ट्वटर आदी सोशल मीडियाचा वापर नव्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणार आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या स्क्रीनवर ‘आपण मतदार यादीत नाव नोंदविले आहे का’ असा संदेश सुरूवातीलाच झळकणार आहे. त्यामुळे मतदाराला आपण नाव नोंदविणे गरजेचे आहे, याची जाणीव होईल. याचबरोबर महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यामधूनही जागृती करण्यात येणार आहे.
मतदारसंख्या वाढणार?
मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी करण्यात येत असलेल्या या प्रयत्नांमुळे येत्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या वाढेल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे. फेसबुक, टिष्ट्वटर आदी सोशल मीडियाचा वापर नव्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणार आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या स्क्रीनवरही आता मतदारांच्या जागृतीचे प्रयत्न होताना दिसत आहेत.