दहावीनंतर काय करू? दोन लाख विद्यार्थ्यांची होणार ॲप्टिट्यूड टेस्ट! शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 08:12 AM2023-11-02T08:12:59+5:302023-11-02T08:13:12+5:30
१५ लाख विद्यार्थ्यांच्या करिअर समुपदेशनासाठी ॲप
रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: करिअरच्या उंबरठ्यावर असलेल्या नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची आवड, कल, क्षमता विचारात घेऊन त्यांचे समुपदेशन करणारी, गरज भासल्यास शास्त्रीय कसोट्यांवर आधारित ॲप्टिट्यूड टेस्ट (अभियोग्यता चाचणी) घेऊन त्यांचा शाखा, विषय निवडीचा मार्ग सुकर करण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे. २०२३-२४ मध्ये परीक्षा देणाऱ्या सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून करिअर निवडीविषयी गोंधळ असलेल्या निवडक दोन लाख विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट घेण्याची योजना आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना विभागाचे प्रशिक्षित समुपदेशक शिक्षक आणि ॲपच्या मदतीने करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केले जाईल.
गेली ६० वर्षे हे काम विभागाच्या व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्थेमार्फत (आयव्हीजीएस) होत होते. राज्यात नऊ ठिकाणी या संस्थेमार्फत कोणत्याही आर्थिक मोबदल्याविना विद्यार्थ्यांना करिअरविषयक समुपदेशन करून घेता येई; परंतु २०१७ साली ही संस्था मोडीत काढून एका खासगी संस्थेमार्फत दहावीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांची ३०-४० ढोबळ प्रश्नांवर आधारलेली कलचाचणी घेऊन त्याचा अहवाल निकालासमवेत देण्याचा घाट विभागाने घातला. ही कलचाचणी सदोष असल्याचे आक्षेप घेतले गेल्याने २०१९ मध्ये ती गुंडाळावी लागली.
सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांना शास्त्रीय कसोट्यांवर आधारित ॲप्टिट्यूड टेस्ट देण्याची कोणतीही मोफत वा स्वस्त सुविधा सरकारी पातळीवर उपलब्ध नाही. खासगी शाळा अथवा संस्थांमार्फत भरपूर पैसे मोजून विद्यार्थाचे करिअर कौन्सिलिंग केले जाते; पण सरकारी शाळा किंवा तळागाळातील सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांकडे अशी कोणतीही सोय नव्हती. ही कमतरता शालेय शिक्षण विभागाच्या नव्या योजनेमुळे भरून निघेल अशी अपेक्षा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे करिअरविषयक समुपदेशन केले जाई, तसेच ज्यांना गरज असेल त्यांची शास्त्रीय कसोट्यांवर आधारलेली ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाईल, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील (एससीईआरटी) सूत्रांनी दिली.
अशी असेल नवी समुपदेशन सुविधा
विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व, आवड, क्षमता, कल, समायोजन याचा विचार करून ही चाचणी घेतली जाईल. दहावी परीक्षेच्या आधी किंवा नंतर ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. सरसकट सर्व विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूट टेस्ट घेतली जाणार नाही. करिअरच्या बाबतीत गोंधळलेल्या ज्या विद्यार्थ्यांची समुपदेशक शिफारस करेल, केवळ त्यांचीच चाचणी होईल.
कोविडनंतर शालेय शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या समुपदेशन सेवेत खंड पडला होता; परंतु आता आपण ती पुन्हा सुरू करत आहोत. त्याकरिता ४० हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यापैकी २७ हजार शिक्षकांचे प्रशिक्षण ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. निवडक दोन लाख विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाईल.
- दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री