श्री सदस्यांच्या मृत्यूबाबत आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 05:25 PM2023-04-17T17:25:57+5:302023-04-17T17:40:26+5:30
आप्पासाहेब यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला, या कार्यक्रमातील १३ जणांचा उष्माघाताने बळी गेला.
Appasaheb Dharmadhikari first Reaction on Maharashtra Bhushan Controversy: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी खारघर येथे झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात भल्या मोठ्या संख्येने श्रीसदस्य उपस्थित होते. त्यापैकी काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील ११ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात जाहीर केली असून उपचार सुरू असलेल्यांचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण या घटनेमुळे विरोधी पक्ष सरकारवर चांगलाच संंतापला आहे. या दरम्यान, उत्सवमूर्ती आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आप्पासाहेब धर्माधिकारी?
"महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण' पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल सारे श्री सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना पत्रकाद्वारे व्यक्त केल्या.
प्रकारावर राज ठाकरे काय म्हणाले?
"राज्य सरकारला घडलेला प्रसंग टाळता आला असता. सकाळी कार्यक्रम करणं गरजेचं नव्हतं. राजभवनावर बोलावून आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देता आला असता. पण सध्या झालेली गोष्ट ही दुर्दैवीच आहे. कार्यक्रम सकाळी न करता संध्याकाळी झाला असता तर हे टाळता आलं असतं. मात्र कोणीही हे मुद्दामून केलेलं नाही. इतरांना जसा पुरस्कार देतात, तसंच राजभवनावर बोलवायला हवं होतं असं मला वाटतं. या कार्यक्रमामागे राजकीय स्वार्थ असल्याशिवाय एवढी माणसं बोलवली जातात का?
संजय राऊतांची प्रतिक्रिया काय?
" महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारी ही दुर्दैवी घटना आहे. आप्पासाहेबांचे लाखो अनुयायी या सोहळ्याला जमतील हे साऱ्यांनाच माहिती होते. त्यामुळे सरकारने जी तयारी करायला हवी होती, ती फक्त VIP लोकांसाठीच केली असं माझं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे लाखो सदस्य आले होते. त्या लाखोंची सोय न पाहता, केवळ गृहमंत्री अमित शाह यांची सोय पाहता भर दुपारच्या वेळेत ही सभा आणि सोहळा ठेवला गेला. हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता तर ही दुर्घटना टळली असती. गृहमंत्री आणि VIP छपराखाली होते, पण श्रीसदस्य उन्हात होते. आम्हाला सोहळ्यावर टीका करायची नाही. राजकारण्यांनी श्रीसदस्यांचा अंत पाहिला", असे अतिशय रोखठोक मत संजय राऊतांनी व्यक्त केले.