जॉली एलएलबी-2 चित्रपटाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 08:43 PM2017-01-19T20:43:30+5:302017-01-19T20:43:30+5:30
जॉली एलएलबी-2 या चित्रपटात वकिली व्यवसायाची आणि न्यायालयीन प्रक्रियेची चेष्टा केल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 19 - जॉली एलएलबी-2 या चित्रपटात वकिली व्यवसायाची आणि न्यायालयीन प्रक्रियेची चेष्टा केल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. चित्रपटातील अवमानकारक शब्द वगळावे आणि जाहिर माफी मागावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. याचिकेवर 24 जानेवारी 2017 रोजी प्राथमिक सुनावणी होणार आहे.
अक्षयकुमारच्या जॉली एलएलबी- 2 या चित्रपटाच्या विरोधात अॅड. अजयकुमार वाघमारे यांच्यावतीने अॅड. पंडीतराव आनेराव यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार या आक्षेपार्ह चित्रीकरणामुळे न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये वकील न्यायालयात पत्ते खेळतात, न्यायमुर्तींच्या आसनासमोर धावून जातात, न्यायमूर्तींसमोर मारामारी आणि बिभत्स नृत्यही करतात. चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, असे लिहून निर्माता व दिग्दर्शकांनी न्यायव्यवस्थेची आणि वकीली व्यावसायाची चेष्टा केली असल्याचा आरोप याचिकेत केला आहे.
याचिकेत केंद्र शासन, केंद्र शासनाच्या माहिती व प्रसासण विभागाचे सचिव, केंद्रीय विधी व न्याय सचिव, सेन्सार बोर्डाचे चेअरमन, फॉक्स स्टार इंडीया स्टुडिओचे निर्माते, चित्रपटाचे निर्माते, निर्देशक व लेखक सुभाष कपुर, कलाकार राजु भाटीया उर्फ अक्षयकुमार, अन्नुकपूर, राज्य शासनाच्या सांस्कृतीक संचालनालयाचे सचिव, विधी व न्याय विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती अॅड. अजयकुमार वाघमारे यांनी दिली.