वकील संपाविरुद्धची याचिका निकाली
By admin | Published: March 31, 2017 04:17 AM2017-03-31T04:17:08+5:302017-03-31T04:17:08+5:30
वकिलांनी कायद्याचे पालन करावे, त्यांचे ज्ञानच त्यांना चुकीचे (संप) करण्यापासून अडवेल, असे म्हणत उच्च न्यायालयाने
मुंबई : वकिलांनी कायद्याचे पालन करावे, त्यांचे ज्ञानच त्यांना चुकीचे (संप) करण्यापासून अडवेल, असे म्हणत उच्च न्यायालयाने वकिलांच्या संपाविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढली. लॉ कमिशनच्या शिफारशींविरुद्ध शुक्रवारी वकिलांचा देशव्यापी संप होणार आहे.
‘अॅडव्होकेट अॅक्ट’मध्ये सुधारणा करण्याची शिफारस लॉ कमिशनने केंद्र सरकारला केली. प्रस्तावित सुधारणेनुसार वकिलांना संपावर जाता येणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार अन्य क्षेत्रातील व्यक्तींना देण्यात येणार आहे. लॉ कमिशनच्या शिफारशींविरुद्ध ‘बार कौन्सिल आॅफ इंडिया’ (बीसीआय)ने संपाची हाक दिली आहे. त्यांना पाठिंबा देत ‘बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अँड गोवा’नेही परिपत्रक काढून सर्व सदस्यांना संपावर जाण्यास सांगितले. ३१ मार्च रोजी संप असल्याने न्यायालयाचे एक दिवसाचे कामकाज ठप्प होणार आहे. या संपाविरुद्ध अॅड. मनोज शिरसाट यांनीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ‘लॉ कमिशनने केलेल्या शिफारशींवर कॅबिनेटने अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा संप निर्णय होण्याआधीच पुकारण्यात आला आहे,’ असे याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.
मात्र, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाने हे परिपत्रक नसून सदस्यांना आवाहन केले आहे, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिका निकाली काढली. (प्रतिनिधी)