जादा व्याजाच्या आमिषात फसवणुकीचा धोका, पोलिसांचे वेळीच सावध होण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 09:39 PM2017-10-08T21:39:02+5:302017-10-08T21:39:23+5:30
नियमित व्याजदरापेक्षा जादा व्याजदराचे अमिष कोणी दाखवित असेल तर हा फसवणुकीचा धोका आहे. वेळीच हा धोका ओळखून सावध व्हा, असे कळकळीचे आवाहन गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
ठाणे: नियमित व्याजदरापेक्षा जादा व्याजदराचे अमिष कोणी दाखवित असेल तर हा फसवणुकीचा धोका आहे. वेळीच हा धोका ओळखून सावध व्हा, असे कळकळीचे आवाहन गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आणि ‘सेवेन इवेन्स डान्स ग्रुप’च्या वतीने आर्थिक आणि सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी कोरम मॉल येथे एका फ्लॅश मॉबचे आयोजन शनिवारी सायंकाळी केले होते. त्यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे आवाहन केले.
पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात आर्थिक आणि सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांनी कशी सावधानता बाळगावी, याचे विवेचन त्यांनी केले. अलीकडे मोठ्या प्रमाणात दाखल होत असलेल्या आर्थिक आणि सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांनी काळजी घेतली तर असे फसवणुकीचे प्रकार रोखता येतील, असेही ते यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, सात ते आठ टक्क्यांपेक्षा जादा म्हणजे अगदी १६ टक्के व्याजदराने पैसे देणा-या खासगी वित्तसंस्था सुरुवातीला विश्वास बसण्यासाठी पैसे देतात. पण, कालांतराने अशाच वित्त संस्थांकडून फसवणूक होते.
मग मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांना गंडा घातला गेल्यानंतर अशा संस्था आपला गाशा गुंडाळून पसार होतात. त्यामुळे वेळीच अशा जादा परतव्याचे आमिष दाखविणा-या व्यक्ती आणि संस्थांपासून सावध व्हा. ब-याचदा क्रेडीट कार्ड बंद करण्याची भीती दाखवूनही एटीएमचा पासवर्ड विचारला जातो. पुढे मग तुमच्या बँक खात्यातून पैसे परस्पर काढले जातात. मुळात, कोणत्याही बँका अशा प्रकारचे पासवर्ड मागत नाहीत, त्यामुळे फोनवरून कोणालाही आपल्या बँक खात्यासंबंधी कोणतीही माहिती देऊ नका. तसेच एटीएममधून पैसे काढताना त्या एटीएम मशिनला स्टिंगर लावलेले नाही ना? याची खात्री करा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मॉलमध्ये आलेल्या अनेक ग्राहकांसह तरुण तरुणी तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त एस. पी. अवसरे, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय सावंत आदी उपस्थित होते.