सक्षमतर्फे ऑनलाईन नेत्रदान संकल्पपत्राचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 07:00 PM2020-09-28T19:00:56+5:302020-09-28T19:34:05+5:30
दिव्यांगासाठी देशभर काम करणाऱ्या सक्षम (समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ ) या संघटनेमार्फत ४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने नेत्रदान संकल्प पत्र भरुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर : दिव्यांगासाठी देशभर काम करणाऱ्या सक्षम (समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ ) या संघटनेमार्फत ४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने नेत्रदान संकल्प पत्र भरुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कॉर्निया अंधत्व मुक्त भारत (कांबा) या उपक्रमा अंतर्गत दि. २१ सप्टेंबर रोजी सुरु झालेली ही विशेष मोहिम ४ ऑक्टोबर २0२0 पर्यंत सुरु राहणार आहे. जीते जीते रक्तदान, जाते जाते नेत्रदान या संकल्पनेनुसार नेत्रदान चळवळीत सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, यासाठी ही मोहिम देशभर सुरु आहे, अशी माहिती सक्षमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अॅड. मुरलीधर कचरे यांनी दिली आहे.
जगातील एकूण दृष्टिबाधीत व्यक्तीं पैकी २५ टक्के व्यक्ती ह्या भारतात असून त्यातील ७.५ टक्के ( ३,३५,००० ) व्यक्ती ह्या कॉर्नियामुळे अंधत्व आलेल्या आहेत. परंतु नेत्रदाना बद्दल जागरूकता कमी असल्यामुळे ह्या संख्येत दरवर्षी ४०,००० जणांची भर पडत आहे.
कोविड-१९ च्या प्रसारामुळे नेत्रदान आणि कॉर्निया शस्त्रक्रिया जवळजवळ बंद आहेत. या स्थितीत कॉर्नियल अंधत्व येणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सक्षमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत कॉर्निया अंधत्वमुक्त भारत अभियानअंतर्गत ४ ऑक्टोंबरपर्यंत नेत्रदान संकल्प सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
कॉर्निया अंधत्व मुक्त भारत अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. पवन स्थापक, सहसंयोजक डॉ. भरत ठाकूर, समन्वयक डॉ. संतोष क्रलेती, सक्षमचे अध्यक्ष डॉ. दयालसिंह पवार यांनी ही मोहिम देशभर यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
सक्षमचे विशेष संकेतस्थळ
सक्षमने विकसित केलेल्या विशेष संकेतस्थळाद्वारे हे नेत्रदान संकल्प पत्र ऑनलाईन पध्दतीने भरुन घेण्यात येत आहे. यासाठीची लिंक व्हॉटस अप, फेसबुकसह इतर समाज माध्यमातून पाठविण्यात येते. हा अर्ज भरताच तत्काळ डिजिटल नेत्रदान प्रमाणपत्र उपलब्ध होते. नेत्रदान संकल्प पत्र या लिंकद्वारे भरण्याचे आवाहन सक्षमने केले आहे.
https://caarya-saksham.web.app/eye-donation-campaign
जागतिक नेत्रदिवसाच्या निमित्ताने ८ ऑक्टोबर २0२0 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सर्वाधिक संकल्प करणाऱ्या राज्यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होउन जास्तीत जास्त नेत्रदान संकल्प करा.
- अॅड. मुरलीधर कचरे,
अध्यक्ष, सक्षम, पश्चिम महाराष्ट्र
डॉ. अविनाश अग्निहोत्री बुधवारी लाईव्ह
देशातील प्रसिद्ध व आघाडीच्या माधव नेत्रपेढीचे सरचिटणीस डॉ. अविनाश अग्निहोत्री यांचे बुधवारी सायंकाळी सहा वाजता सक्षम संवाद हे ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ. अग्निहोत्री नेत्र दान व नेत्रपेढीच्या कामा संदर्भात माहिती देणार असून सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. डॉ.अविनाश अग्निहोत्री बुधवारी सांयकाळी ६ वाजता सक्षमच्या फेसबुक पेजवर लाईव्ह असणार आहेत.
https://www.facebook.com/Saksham-Paschim-Maharashtra-114564626930626/