पोलिसांकडून सावधगिरीचे आवाहन
By admin | Published: May 15, 2017 05:57 AM2017-05-15T05:57:52+5:302017-05-15T05:57:52+5:30
मुंबईतून २६ पाकिस्तानी बेपत्ता असल्याबाबत अधिकृतपणे अद्याप आमच्यापर्यंत कसलीही माहिती आलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतून २६ पाकिस्तानी बेपत्ता असल्याबाबत अधिकृतपणे अद्याप आमच्यापर्यंत कसलीही माहिती आलेली नाही. मात्र आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेत असून आपल्या परिसरात संशयास्पद व्यक्ती, वस्तू निदर्शनास आल्यास त्याबाबत तातडीने पोलिसांना माहिती कळवावी, असे राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
जुहू परिसरात राहत असलेला एक पाकिस्तानी दुकानदार व अन्य २५ पाक नागरिक मुंबईतून अचानक नाहिसे झाले आहेत. दोन आठवड्यांपासून त्यांचा ठावठिकाणा आढळून येत नाही, असे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काहीही बोलत नसल्याने त्याबाबत गूढ वाढले होते. एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी रविवारी त्याबाबत बोलताना अधिकृतपणे एटीएसला अशी काही माहिती कळवण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी घाबरून कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच संशयास्पद व्यक्ती, वस्तूंची माहिती निदर्शनास आल्यास त्याबाबत तातडीने पोलिसांना माहिती कळवावी, असे आवाहन केले. मुंबईचे (कायदा व सुव्यवस्था) सहआयुक्त देवेन भारती यांनीही पाक नागरिक बेपत्ता असल्याबाबत आमच्याकडे काहीही माहिती नसल्याचे सांगितले.