एकाच वेळी विवाह आणि ड्युटीवर हजर
By admin | Published: February 1, 2016 02:45 AM2016-02-01T02:45:37+5:302016-02-01T11:18:46+5:30
कर्तव्य बजावण्याच्या वेळेत कोणत्याही स्थितीत आपले कार्यक्षेत्र सोडू नये, हा पोलीस दलात लिखित नियम सर्वांसाठी बंधनकारक आहे.
जमीर काझी, मुंबई
कर्तव्य बजावण्याच्या वेळेत कोणत्याही स्थितीत आपले कार्यक्षेत्र सोडू नये, हा पोलीस दलात लिखित नियम सर्वांसाठी बंधनकारक आहे. तथापि, वरिष्ठांच्या मर्जीतील अधिकारी-कर्मचारी त्याचा कसा दुरुपयोग करतात, याचे उदाहरण मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेच्या दिंडोशी चौकीत समोर आले. येथील दोन हवालदार ‘आॅनड्युटी’ चक्क बारामतीतील एका विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. असे असतानाही पठाणवाडी सब-वे येथे त्यांनी ड्युटी केल्याची नोंद वरिष्ठांनी अभिलेखात (ड्युटी डायरी) केली आहे. या अजब प्रकाराची चर्चा सध्या वाहतूक पोलिसांत रंगली आहे.
एका कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांने त्यांचे हे बिंग उघड केले आहे. या दोन आॅनड्युटी पोलिसांचे बारामतीतील लग्नसोहळ्यात हजर असल्याचे फोटोसह पुरावे सादर करूनही वरिष्ठांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्याबाबत त्यांनी थेट पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित व गृहखात्याची धुरा सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याबाबत संबंधितांकडे विचारणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले.
दिंडोशी वाहतूक चौकीतील ड्युटी मास्टर म्हणून काम करणारे हवालदार कोळेकर व कॅशियर दिनकर हराळे अशी पोलिसांची नावे आहेत. लग्नाला उपस्थित राहिलेल्या दिवशी त्यांनी ड्युटी बजाविल्याची नोंद चौकीचे प्रभारी निरीक्षक बी.जी.शिंदे यांनी अभिलेखावर घेतली आहे. त्याबाबत विभागातील उपायुक्त, सहआयुक्ताकडे पुराव्यानिशी तक्रार देऊनही कार्यवाही होत नसल्याने, या प्रकाराची चौकशी करण्यासाठी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात आली आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेच्या दिंडोशी चौकीतील कॉन्स्टेबल श्रीकांत शिंदे यांचा विवाह २१ डिसेंबरला बारामतीतील इंदापूर रोडवरील मार्केट यार्ड परिसरातील रयत भवन मंगल कार्यालयात होता. त्यासाठी चौकीतील काही अधिकारी-कर्मचारी रजा घेऊन हजर होते. निरीक्षक शिंदे यांच्या मर्जीतील हवालदार कोळेकर व हराळे हेसुद्धा त्यासाठी बारामतीला गेले होते. मात्र, त्यासाठी त्यांनी रजा घेतलीच नाही, तर ‘आॅनड्युटी’ दिवसभर चौकीच्या कार्यक्षेत्राबाहेरच नव्हे, तर चक्क बारामतीत घालविला. मात्र, निरीक्षक शिंदे यांनी कोळेकर हे दुय्यम प्रभारी मदतनीस म्हणून, तर हराळे यांनी पठाणवाडी सबवे या ठिकाणी ड्युटी केल्याची नोंद डायरीत केली आहे.
ही माहिती मिळाल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने त्या अभिलेखाची प्रत, त्यादिवशी लग्न सोहळ्यात हजर असलेल्या पोलिसांचे फोटो व अन्य पुरावे पोलीस उपायुक्त, सहआयुक्त (वाहतूक) यांना महिन्याभरापूर्वी सादर केले. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने, त्यांनी अखेर थेट मुंबईचे पोलीस आयुक्त, महासंचालक दीक्षित व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धाव घेतली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशीचे आदेश दिले जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.