११ वेळा यूपीएससीसी परीक्षा दिली? पूजा खेडकर म्हणाल्या,"दररोज नव्या गोष्टी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 01:20 PM2024-07-16T13:20:54+5:302024-07-16T13:25:38+5:30

IAS Officer Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर रोज नवे आरोप असल्याने त्यांनी आता याबाबत भाष्य केलं आहे.

Appeared for UPSC exam 11 times IAS Pooja Khedkar finally spoke in detail | ११ वेळा यूपीएससीसी परीक्षा दिली? पूजा खेडकर म्हणाल्या,"दररोज नव्या गोष्टी..."

११ वेळा यूपीएससीसी परीक्षा दिली? पूजा खेडकर म्हणाल्या,"दररोज नव्या गोष्टी..."

IAS Pooja Khedkar: प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात रोज नवे खुलासे होताना दिसत आहेत. पूजा खेडकर यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळण्यासाठी कशाप्रकारचे प्रयत्न केले हे समोर येत आहेत. सगळे प्रयत्न संपल्यानंतरही खेडकर यांनी नाव बदलून परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी ११ वेळा परीक्षा दिल्याची चर्चा  सध्या सर्वत्र सुरु आहे. यावरुनच आता माध्यमांशी बोलताना पूजा खेडकर यांनी या आरोपांबाबत भाष्य केलं आहे.

पूजा खेडकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा पूजा खेडकर यांच्या शासकीय विश्रामगृहावर पोलिसांची टीम दाखल झाली होती. त्यानंतर  पूजा खेडकर यांनी आपणच पोलिसांना बोलावलं होतं, ते चौकशीसाठी आले नव्हते असा दावा केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खेडकर यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत भाष्य केले. आपल्या विषयी खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी केला.

"जे सत्य आहे ते समोर येईल. मी काही लपवलेलं नाही. सरकारने गठीत केलेल्या समितीशी जो काही संवाद साधला जातो त्यात गुप्तता पाळली जाते. यामुळे ते लोकांशी, माध्यमांशी शेअर करु शकत नाही. सर्व चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. जी काही कागदपत्रं, माहिती मी दिली आहे त्यासाठी समिती आहे. तज्ज्ञ यासंबंधी निर्णय घेतली आणि त्यासाठी आपण वाट पाहिली पाहिजे," असे खेडकर म्हणाल्या.

यावेळी माध्यमांनी त्यांना तुम्ही ११ वेळा परीक्षा दिल्याचा दावा केला जात असल्याबाबत प्रश्न विचारला. "आता जर तुम्ही म्हणत आहात तर कमिटीसमोर सगळं सत्य समोर येईलच. दररोज नव्या फेक गोष्टी समोर येत आहेत. फेक न्यूज दिल्या जात आहेत. अशी कोणता व्यक्ती असते ज्याची रोज काही नवीन माहिती मिळत असते. खोटी माहिती पसरवली जात आहे. माझी फार मानहानी होत आहे. माध्यमांनी जबाबदारीने वागायला हवं. माझा माध्यमांवर विश्वास आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असताना जी काही माहिती आहे, ती खोटी म्हणून पसरवू नका," असेही पूजा खेडकर म्हणाल्या.

दरम्यान, नियमानुसार या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त ६ प्रयत्न असतात. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही मर्यादा ९ आहे. दुसरीकडे खेडकर यांनी या परीक्षेसाठी ११ वेळा प्रयत्न केल्याचे म्हटलं जात आहे. यासाठी इतर मागासवर्गीय कोट्याचा  आणि अपंगत्वाच्या तरतुदींचा गैरवापर केल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर आहे.  पूजा यांनी ‘खेडकर पूजा दिलीपराव’ या नावाने २०२०-२१ पर्यंत परीक्षा दिली होती. त्यानंतर २०२१-२२ मध्ये त्यांनी ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’, असे नाव बदलून प्रयत्न संपल्यानंतरही दोन वेळा परीक्षा दिल्याचे म्हटलं जात आहे.
 

Web Title: Appeared for UPSC exam 11 times IAS Pooja Khedkar finally spoke in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.