वरवरा राव, ढवळे यांच्यासह इतर सात जणांचा जामिनाकरिता अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 07:43 PM2019-07-06T19:43:27+5:302019-07-06T19:44:58+5:30
शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदप्रकरणी काही जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
पुणे : एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, अरुण फरेरा, वरवरा राव, महेश राऊत, व्हार्नोन गोंसालविस , सुधा भारद्वाज आणि रोना विल्सन यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस. जोंधळे यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.
सध्या विशेष न्यायाधीश आर.एम. पांडे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र बचाव पक्षाने युएपीए कायद्याअंतर्गत या न्यायालयास खटले चालविण्याचा परवानगी नसल्याच्या दावा दाखल करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस. जोंधळे यांच्या न्यायालयात डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर सोमवारी (8 जुलै ) रोजी सुनावणी होणार आहे. बचाव पक्ष्याच्या वतीने राहुल देशमुख, पार्थ शहा, सिद्धार्थ पाटील यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सरकारी व बचाव पक्ष्याच्या वतीने सत्र न्यायाधीश आर.एम. पांडे न्यायालयात काही अर्ज करण्यात आले आहेत. यावर एकत्रितपणे 18 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये समोर आणले होते. याच अनुषंगाने देशभर पोलिसांचे धाडसत्र सुरू होते. त्यात सुरुवातील एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी अॅड. सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, रोना विल्सन, महेश राऊत आणि शोमा सेन यांना अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यानंतर पी. वरवरा राव, व्हर्णन गोन्सालवीस आणि अरूण थॉमस फरेरा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी होऊन राव, गोन्सालवीस, फरेरा, नवलाखा आणि भारद्वाज यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पत्रकार गौतम नवलाखा यांनाही दिल्ली न्यायालयाने नजर कैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता. याप्रकरणी अंतिम आदेशात सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या नजरकैदेत चार आठवड्यांची वाढ केली आहे. तसेच त्यांना अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याची मूभा असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच भारद्वाज यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. भारद्वाज यांच्या वतीने अॅड. युग चौधरी यांनी हा अर्ज दाखल केला आहे.
याप्रकरणात अटक करण्यात आलेले अॅड. सुरेंद्र गडलींग, सुधीर ढवळे, रोना विल्सन, महेश राऊत आणि शोमा सेन यांच्यासह सात जणांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
सुधीर ढवळे याने शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. त्यांना सुरेंद्र गडलिंग व दिल्लीतील रोना विल्सन यांची मदत घेण्यात आली. एल्गार परिषदेत जाणीवपूर्वक चिथवाणीखोर भाषण देऊन दोन गटात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे दुस-या दिवशी कोरेगाव भीमा याठिकाणी दंगल उसळली. 17 एप्रिल रोजी पोलीसांनी देशभरात छापेमारी करुन महत्वपूर्ण दस्तावेज जप्त केले. त्यावरुन गडलिंग, विल्सन हे सीपीआय माओवादी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे दिसून आले. यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी व नंतर कारवाई करण्यात आलेले आरोपी यांच्यात सातत्याने संर्पक असल्याचे दिसून आले आहे.