हिमायत बेगचा न्यायालयात अर्ज
By Admin | Published: October 4, 2015 04:03 AM2015-10-04T04:03:45+5:302015-10-04T04:03:45+5:30
पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी असलेल्या हिमायत बेगने नागपूर कारागृहातून जवळच्या कारागृहात हलवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.
मुंबई : पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी असलेल्या हिमायत बेगने नागपूर कारागृहातून जवळच्या कारागृहात हलवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी पुण्याच्या सत्र न्यायालयाने हिमायत बेग याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात सरकारने याचिका केली आहे. बेगने या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्याच्या अपिलावरील सुनावणी न्या. नरेश पाटील आणि एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे.
अपिलावरील सुनावणीदरम्यान बेगला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात येते. त्यावेळी बेगने वकिलांना सूचना देण्याकरिता मुंबई किंवा अन्य जवळच्या कारागृहात हलवण्यात यावे, असा अर्ज खंडपीठाकडे केला. या अर्जावर ५ आॅक्टोबरपर्यंत म्हणणे मांडण्याचे निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. अपिलावरील सुनावणीसाठी बेगला आॅगस्टमध्ये उच्च न्यायालयात हजर करण्यात आले. कोणतीही विपरीत घटना घडू नये, यासाठी उच्च न्यायालय आणि कोर्ट रूमच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त होता. मात्र त्याच्या जीवाला धोका असल्याने खंडपीठाने त्याला व्हिडीओ कॉन्फसरन्सद्वारे न्यायालयात उपस्थित ठेवण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला दिले.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यू, तर ५८ जण गंभीररीत्या जखमी झाले. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. २०१३ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने बेगला बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली.