अधिवेशनात सहभागाचा कदम यांचा अर्ज फेटाळला
By admin | Published: March 28, 2017 03:35 AM2017-03-28T03:35:22+5:302017-03-28T03:35:22+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी
मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांचे विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात कामकाजात सहभागी होण्याचे स्वप्न भंगले आहे. विधानसभेत उपस्थित राहण्यासाठी आपल्याला तात्पुरता जामीन मिळावा, असा त्यांनी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळला.
अधिवेशनात सहभागी होण्यासंदर्भात कदम यांनी केलेल्या अर्जावर न्या.ए.एस.गडकरी यांच्या समोर सुनावणी झाली. ‘अधिवेशनात जाणे हा कदम यांचा मुलभूत अधिकार आहे आणि तो त्यांना घटनेने दिलेला आहे. त्यांना अधिवेशनात सहभागी होऊ न दिल्यास ते घटनेच्या मूलभूत तत्वाचे उल्लंघन ठरेल, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला.
सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी, कदम यांना कायदेशीर मार्गानेच कोठडी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सभागृहात उपस्थित राहणे हा आमदार म्हणून मुलभूत अधिकार असल्याचा त्यांचा दावा स्वीकारता येणार नाही. त्यांना तात्पुरता जामीन देणे कायद्याला धरून नाही, असा युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने या आधी अन्य प्रकरणात दिलेल्या निर्णयाचे दोन दाखले आणि सुरेश कलमाडी प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला अॅड.चव्हाण यांनी यावेळी दिला.
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्या.गडकरी यांनी कदम यांचा अधिवेशनात सहभागी होण्यासाठी तात्पुरता जामीन मिळण्यासंबंधीचा अर्ज फेटाळला. (विशेष प्रतिनिधी)