बारावी परीक्षेचे अर्ज भरता येणार 15 डिसेंबरपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 04:14 AM2020-12-13T04:14:33+5:302020-12-13T06:56:45+5:30
राज्य शिक्षण मंडळ : मुदत ४ जानेवारीपर्यंत
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०२१ आयाेजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात येणार आहे.
बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत सरल डेटाबेसवरून १५ डिसेंबर, २०२० पासून ४ जानेवारी, २०२१ पर्यंत भरायचे आहेत, तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार, तसेच काही विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ५ ते १८ जानेवारी, २०२१ दरम्यान ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येतील.
विद्यार्थ्यांचे अर्ज भरल्यानंतर त्यांना महाविद्यालयीन लॉगिनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करून दिली जाईल. प्री-लिस्टवरील माहिती आणि जनरल रजिस्टरमधील माहिती विद्यार्थ्यांनी पडताळून पाहून खात्री करून अर्ज निश्चित करायचा आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच अर्ज भरावे, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले.
फॉर्म नंबर १७ भरणाऱ्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रक
फॉर्म नंबर १७ द्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांची २०२१ मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाईल. त्यामुळे जाहीर केलेल्या कालावधीत या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरू नयेत, असेही मंडळाने स्पष्ट केले.
अर्ज भरण्याच्या तारखा
नियमित विद्यार्थी – १५ डिसेंबर, २०२० ते ४ जानेवारी, २०२१
व्यवसाय अभ्यासक्रमचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार विद्यार्थी – ५ ते १८ जानेवारी, २०२१