मुंबई महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी लागू करणार
By admin | Published: April 7, 2016 02:50 AM2016-04-07T02:50:15+5:302016-04-07T02:50:15+5:30
मुंबई पालिकेच्या घनकचरा खात्यातील सफाई कामगारांसाठी मेकॅनिकल स्विपिंग पद्धत लागू करणार नाही, असे स्पष्ट करतानाच, मुंबई पालिकेत टप्प्याटप्प्याने बायोमेट्रिक पद्धत लागू करण्यात येईल
मुंबई : मुंबई पालिकेच्या घनकचरा खात्यातील सफाई कामगारांसाठी मेकॅनिकल स्विपिंग पद्धत लागू करणार नाही, असे स्पष्ट करतानाच, मुंबई पालिकेत टप्प्याटप्प्याने बायोमेट्रिक पद्धत लागू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. जनार्दन चांदूरकर यांनी मुंबई पालिकेच्या घनकचरा विभागात बायोमेट्रिक प्रणालीचा वापर असल्याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, ‘सफाई कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार नाही किंवा पदे कमी करण्यात येणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत आहे. बायोमेट्रिकमुळे सफाई कामगार वेळेत कामावर येतील. महत्त्वाची बाब म्हणजे, सफाई कामगारांना खूप पगार आहेत. परिणामी, सफाई कामगार बदली कामगार नेमतात. आपल्या पगारातील २५ टक्के रक्कम बदली कामगारांना, तर अधिकाऱ्यांना १० टक्के रक्कम सफाई कामगारांकडून दिली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. म्हणून या पद्धतीचा अवलंब करण्यावर जोर दिला जात आहे. (प्रतिनिधी)