ठाणेकरांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू
By admin | Published: July 6, 2017 04:46 PM2017-07-06T16:46:02+5:302017-07-06T16:49:21+5:30
ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत अतिम अधिसूचना जारी
Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 6 - ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत अतिम अधिसूचना जारी झाली आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
क्लस्टर योजनेमुळे ठाण्यात पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होवून काही काळासाठी जवळपास बंद झालेल्या विकासाला पुन्हा चालना मिळणार आहे. ठाण्यात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची संख्या अधिक आहे. महापालिकेच्या आकडेवारी नुसार ठाण्यात 4261 अधिकृत इमारती मोडकळीस आल्यासून त्या जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहेत. तर 17 हजार 873 अनधिकृत इमारती देखील पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. क्लस्टर योजनेत या इमारतींचा विकास करताना विकासकाला 4 चटई क्षेत्रफळात विकास करायचा आहे. तर उर्वरीत चटई क्षेत्रात विकासकाला बाजार भावाने घरे विकता येणार असल्याने विकासकांचा फायदा होणार आहे. दरम्यान अजूनपर्यंत नेमके चित्र स्पष्ट झाले नसले तरी ठाणे महापालिकेची भूमिका देखील याबाबत महत्वाची असेल हे निश्चित.
ठाणे महापालिकाच क्लस्टर विकासाचे नियोजन करणार आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसारच बांधकाम करण्याचे बंधन विकासकाला असणार आहे. असे असले तरी क्लस्टरमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळणार आहे. पालिकेच्या इम्पॅक्टअसेसमेंट अहवालात वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा अशा ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या परिसराचा संपूर्ण चेहेरा मोहराच बदलणार आहे. क्लस्टरमुळे या भागाची कोंडी फुटणार आहे. दरम्यान राज्य शासनाकडून क्लस्टर बाबतच्या अध्यादेशाच्या प्रतीक्षेत महापालिका असून अध्यादेश प्राप्त झाल्यावर लगेचच या योजनेच्या अंमलबजावणी साठी पालिका प्रयत्न करणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.
मुंबई उपनगरे, ठाणे, नवी मुंबई गावठाण परिसर व सिडको हद्दीतील परिसर या भागांसाठी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ योजना जाहीर करून त्याकरिता चार चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी जाहीर केला होता.