‘आचारसंहिता लागू करा’
By Admin | Published: November 4, 2016 05:30 AM2016-11-04T05:30:09+5:302016-11-04T05:30:09+5:30
वांद्रे पूर्वेकडील एमएमआरडीएच्या मैदानात १९ नोव्हेंबर रोजी ग्लोबल सिटिझन या संस्थेतर्फे ‘कोल्ड प्ले’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
मुंबई : वांद्रे पूर्वेकडील एमएमआरडीएच्या मैदानात १९ नोव्हेंबर रोजी ग्लोबल सिटिझन या संस्थेतर्फे ‘कोल्ड प्ले’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी धोरणात्मक भागीदार म्हणून महाराष्ट्र शासनाचाही सहभाग असून, या कार्यक्रमाला निवडणूक आचारसंहितेचे नियम लागू करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनाची धोरणात्मक भागीदार म्हणून ग्लोबल सिटिझन्स इंडिया या संस्थेच्या वेबसाइटवर नोंद आहे. एमएमआरडीएच्या मैदानाच्या भाड्यात या कार्यक्रमासाठी ७५ टक्के सवलत देण्याचाही निर्णय कोणत्याही धोरणाशिवाय घेण्यात आला आहे. शिवाय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये या कार्यक्रमाला करमणूक करही माफ करण्यात आला असून, इतर कोणत्याही संस्थांना अशी सवलत मिळत नाही, याकडे निरुपम यांनी लक्ष वेधले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे व्यासपीठ राजकीय होईल, असे निरुपम यांचे म्हणणे आहे.‘कोल्ड प्ले’ कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा किंवा निवडणूकीनंतर संबंधितांना आयोजन करण्याची परवानगी देण्यात यावी, असेही ते म्हणाले.