लातूरमध्ये टँकर भरणास्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू
By admin | Published: March 21, 2016 03:21 AM2016-03-21T03:21:23+5:302016-03-21T03:21:23+5:30
पाण्याचे टँकर भरताना येणारा व्यत्यय लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात एकूण २१ ठिकाणी प्रतिबंधात्मक (कलम १४४) आदेश लागू केले होते. मात्र जिल्ह्यातील १५ ठिकाणचे आदेश रद्द
लातूर : पाण्याचे टँकर भरताना येणारा व्यत्यय लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात एकूण २१ ठिकाणी प्रतिबंधात्मक (कलम १४४) आदेश लागू केले होते. मात्र जिल्ह्यातील १५ ठिकाणचे आदेश रद्द करून शहरातील ६ ठिकाणी उपरोक्त कलम रविवारी लागू केले.
टँकर भरणास्थळाच्या ५० मीटर्स क्षेत्रात हे आदेश लागू राहणार आहेत. शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली डोंगरगाव बॅरेजेस, निम्न तेरणा, भंडारवाडी तलावातून २५ हजार लिटर्स क्षमतेच्या टँकरद्वारे पाणी आणले जात आहे. त्यामुळे या मार्गावरील शेंद, ताजपूर पाटी, सुगाव पाटी, मसलगा पाटी, गौर पाटी, कवठा पाटी, चिंचोली मोड, हालकी, वांजरखेडा पाटी, तळेगाव, बोरी पाटी, माळकोंडजी आदी ठिकाणी पाणी पुरवठ्यास व्यत्यय येईल, याची शक्यता गृहित धरून १४४ कलम लागू केले होते. मात्र येथील आदेश रद्द करून लातूर शहरातील शासकीय कॉलनी, सरस्वती कॉलनीतील, अंबाजोगाई रोड, गांधी चौक, नांदेड नाका आणि कॉईल नगर येथीली जलकुंभ टँकर पॉर्इंटवर १ एप्रिलपर्यंत १४४ कलम लागू केले आहे. टंचाईमुळे या ठिकाणीही लोकांची तेथे गर्दी होते व भांडणे होतात. आंदोलनेही केली जातात. त्यामुळे पाणी पुरवठ्यास व्यत्यय येतो. हा व्यत्यय येऊ नये या उद्देशाने शहरातील ६ ठिकाणच्या टँकर भरणास्थळावर प्रतिबंधात्मक कलम लागू केल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)