‘त्या’गोरक्षकांवर कारवाईसाठी प्रत्येक ठिकाणी वरिष्ठ अधिकारी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 06:15 PM2017-10-01T18:15:46+5:302017-10-01T18:16:13+5:30
गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार व समाजामध्ये तणाव निर्माण करणा-या कथित गोरक्षकांवर कारवाई करण्यासाठी आता प्रत्येक पोलीस घटकांत स्वतंत्र समन्वय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
जमीर काझी
मुंबई : गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार व समाजामध्ये तणाव निर्माण करणा-या कथित गोरक्षकांवर कारवाई करण्यासाठी आता प्रत्येक पोलीस घटकांत स्वतंत्र समन्वय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयुक्तालयातर्गंत उपायुकत दर्जाच्या तर जिल्हास्तरावर गृह उपअधीक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी त्याबाबतचे आदेश प्रत्येक पोलीस घटकप्रमुखांना त्याबाबतचे आदेश बजाविले आहेत. कथित गोरक्षक व संघटनांच्या हालचालीवर लक्ष ठेवून प्रभारी अधिकाºयांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा त्यांनी घ्यावयाचा आहे.
गोरक्षकांच्या नावाखाली काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक विशिष्ट समाजातील निरपराधांना ‘टार्गेट’करण्यात येत असल्याच्या घटना देशभरात विविध ठिकाणी घडल्या. त्यामुळे त्यावर शासनाने ठोस भूमिका घेण्यासाठी तहसिन पुनावाला या सामाजिक कार्यकर्त्याने गेल्यावर्षी सवौच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबत सुरु असलेल्या सुनावणीत वेळोवेळी केंद्र व राज्य सरकारला निर्देश देण्यात येत आहेत. कथित गोरक्षकांकडून जाणीवपूर्वक हिंसा घडवून समाजात तणाव निर्माण केल्याचे दिसून आल्याने न्यायालयाने त्यावर प्रतिबंधासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश देवून त्याबाबतचा अहवाल मागितला आहे. त्यानुसार महाराष्टÑातील प्रत्येक पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेचा (एसबी-१) उपायुक्त व अधीक्षक कार्यालयामध्ये गृह उपअधीक्षकांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गोरक्षक संघटना, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची यादी संकलित करुन त्यांच्या हालचालीवर लक्ष तसेच, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांना वेळोवेळी सूचना करावयाच्या आहेत. त्याचप्रमाणे संबंधित संघटनांच्या पदाधिकाºयांच्या बैठका घेवून समाजात तणाव निर्माण होऊ न देण्याबाबत सूचना करावयाच्या आहेत. त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी पोलीस मुख्यालयाला पाठवावयाचा आहे.
समन्वय अधिका-यांची जबाबदारी
*गोरक्षकांच्या संशयास्पद हालचालीवर पाळत ठेवून त्यांच्याकडून होणाºया कृत्याला तातडीने पायबंद घालण्यासाठी प्रभारी अधिकाºयांना सूचना करणे
*कथित गोरक्षक कायदा हातात घेवून बेकायदेशीरपणे वाहने अडविण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न असल्यास त्यावर तातडीने कारवाई करणे
*महामार्ग, राज्य महामागावर आवश्यकतेप्रमाणे गस्ती पथक निर्माण करणे, त्यासाठी महामार्ग पोलिसांशी समन्वय साधणे