अधिकाऱ्यांची नियुक्ती मार्गी
By admin | Published: January 20, 2017 12:54 AM2017-01-20T00:54:41+5:302017-01-20T00:54:41+5:30
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी ११ निवडणूक कार्यालये निश्चित केली आहे. आयुक्त दौऱ्यावर असल्यामुळे निवडणूक अधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर निवडणूक विभागाने नवीन नियुक्त्यांची कार्यवाही तातडीने केली.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी व निवडणूक विभागाचे कक्ष प्रमुख यांची बैठक बुधवारी झाली. स्थायी समिती सभागृहात आज दुपारी झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सहायक आयुक्त डॉ.यशवंतराव माने, मुख्य लेखापरिक्षक पदमश्री तळदेकर, मुख्यलेखापाल राजेश लांडे, सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, डॉ. प्रवीण अष्टीकर, चंद्रकांत इंदलकर, योगेश कडूसकर, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, आचारसंहिता कक्षप्रमुख सुरेश जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी सोनाप्पा यमगर, पुरुषोत्तम जाधव, अण्णासाहेब चव्हाण, स्नेहल भोसले, मंजिरी मनोलकर, एम.आर. मिसकर, रुपाली आवले, संतोष देशमुख, स्नेहल बर्गे, संजीव देशमुख, वैशाली उंटवाल, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम आदी उपस्थित होते.
या वेळी अधिकाऱ्यांना निवडणूक कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. यानंतर रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. अधिकारी संबंधित नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत. (प्रतिनिधी)
महापालिका निवडणुकीच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्याने वेळोवेळी होणाऱ्या कायद्यातील बदलांचा अभ्यास करावा. त्यानुसार आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
- दिनेश वाघमारे, आयुक्त, महापालिका