‘त्या’ ४९८ उमेदवारांना नियुक्ती आदेश; एमपीएससी २०२२ चे उमेदवार, अद्याप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:22 IST2025-02-23T06:22:45+5:302025-02-23T06:22:53+5:30
‘लाेकमत’ने या विषयाला वाचा फाेडल्यानंतर मुख्यमंत्री व प्रशासनाने तातडीने दखल घेत त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले.

‘त्या’ ४९८ उमेदवारांना नियुक्ती आदेश; एमपीएससी २०२२ चे उमेदवार, अद्याप...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमपीएससी २०२२ च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीतही यशस्वी ठरलेल्या ४९८ उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश अखेर प्रशासनाने निर्गमित केले. परीक्षेतील गट ‘अ’च्या २२९ आणि गट ‘ब’च्या २६९ उमेदवारांचा यात समावेश आहे. वर्षभरापासून हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत हाेते. ‘लाेकमत’ने या विषयाला वाचा फाेडल्यानंतर मुख्यमंत्री व प्रशासनाने तातडीने दखल घेत त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले.
शुक्रवारी शासन निर्णय जारी झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर माहिती देत नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले.
या संवर्गातील झाल्या नियुक्त्या
उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त, सहायक राज्य कर आयुक्त, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक गट अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी आदी संवर्गातील पदांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.
राजपत्रित संवर्गाच्या २२९ उमेदवारांना नमूद पदावर २ एप्रिल २०२५ पासून दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती मिळेल.