नियुक्ती शिक्षकाची; काम लेखनिकाचे
By Admin | Published: March 4, 2016 12:47 AM2016-03-04T00:47:21+5:302016-03-04T00:47:21+5:30
महापालिका शिक्षण मंडळात शिक्षक म्हणून नियुक्ती असलेल्या काहीजणांना शिक्षण मंडळ कार्यालयात ‘पर्यवेक्षक’ या पदावर आणून त्यांच्याकडून लेखनिकांची; तसेच अन्य व्यवस्थापकीय कामे करून घेण्यात येत आहेत.
पुणे : महापालिका शिक्षण मंडळात शिक्षक म्हणून नियुक्ती असलेल्या काहीजणांना शिक्षण मंडळ कार्यालयात ‘पर्यवेक्षक’ या पदावर आणून त्यांच्याकडून लेखनिकांची; तसेच अन्य व्यवस्थापकीय कामे करून घेण्यात येत आहेत. त्यांच्या मूळ जागेवर कंत्राटी शिक्षक नियुक्त करून त्यांच्याकडून काम भागविले जात असल्याने गरीब विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होत आहे.
पर्यवेक्षक म्हणून विविध शाळांमधून शिक्षण मंडळात आणलेल्या या शिक्षकांपैकी बहुतेकजण बीएससी, बी.एड., एमएससी. एम.एड. असे उच्च विद्याविभूषित आहेत. श्रीमती शां. बा. ढोले पाटील विद्यालय, सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय, बा. स. कन्या विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, रफी अहमद विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय अशा शाळांमध्ये त्यांच्या शिक्षक म्हणून नियुक्त्या आहेत. इंग्रजी, गणित तसेच शास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. याच विषयांमध्ये महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी कमी पडतात. त्यांची या विषयांची तयारी करून घेण्याची जबाबदारी याच शिक्षकांची आहे.
असे असताना त्यांना ‘पर्यवेक्षक’ अशी जबाबदारी देऊन शिक्षण मंडळ कार्यालयात आणण्यात आले. त्यांच्या मूळ जागेवर करार पद्धतीने शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता व शिक्षक असतानाही पर्यवेक्षक म्हणून लेखनिकांचे काम करणाऱ्यांची शैक्षणिक पात्रता यात बराच फरक आहे. साहजिकच त्याचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. करार पद्धतीने काम करणाऱ्यांना कमी वेतनात शिकवण्याचे काम करावे लागत आहे, तर कायम शिक्षकाचे वेतन घेऊनही पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झालेले लेखनिकांचे काम करीत आहेत.
शिक्षक म्हणून त्यांचे वेतन सरकारी अनुदानातून होते व ज्या कामासाठी त्यांना हे वेतन मिळते, त्याच कामासाठी पालिका करार पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांना पुन्हा वेतन देत असते. एकाच कामासाठी दोन व्यक्ती नियुक्त करून, त्यांना वेतन अदा करण्याचा हा प्रकार गेली अनेक वर्षे सुरू आहे.
‘पर्यवेक्षक’ म्हणून शिक्षण मंडळात नियुक्ती झालेल्यांनी काय काम करायचे, हे निश्चित नाही. प्रशासकीय कामात सतत हस्तक्षेप करणे, शिक्षकांना बदल्यांबाबत वेठीस धरणे, काही शिक्षकांना मानसिक त्रास देणे असे प्रकार त्यांच्याकडून होत असल्याच्या तक्रारी शिक्षण मंडळाला मिळाल्या आहेत. त्यांच्यातील काहींना राजकीय, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचेही या तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्या सर्वांना त्यांच्या मूळ जागेवर पाठवावे, अशी मागणी होतआहे. (प्रतिनिधी)