एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्याचा अपमान नाही; राज्यपाल कोश्यारी यांची सारवासारव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 05:42 AM2022-07-31T05:42:51+5:302022-07-31T05:43:03+5:30
आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. मराठी माणसाला डिवचू नका, इतकेच आपल्याला सांगतो, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावर दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही, असे स्पष्टीकरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या विधानावरील वादळानंतर दिले.
राज्यपालांनी म्हटले आहे की, विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठीभूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानीसुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो.
मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत, असेही राज्यपालांनी म्हटले आहे.
इतिहास माहिती नसेल, तर बोलत जाऊ नका : राज ठाकरे
आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. मराठी माणसाला डिवचू नका, इतकेच आपल्याला सांगतो, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावर दिला.
एक पत्र ट्वीट करून राज यांनी म्हटले की, राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे पद आहे म्हणून आपल्याविरुध्द बोलायला लोक कचरतात; परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.
महाराष्ट्रात मराठी माणसाने येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे
त्यांना असे वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितले म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही.
राज्यपाल पदावरून हटवा : संभाजीराजे
महाराष्ट्राच्या परंपरेचे भान असणारी व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमावी, असे ट्वीट माजी खासदार संभाजीराजे यांनी केले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी हे ट्वीट केले आहे. कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची व या ठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याविषयी आदर असणारी योग्य व्यक्ती नेमावी, असेही त्यांनी म्हटले आहे.