राज्यातील चौदाशे निवासी डॉक्टरांच्या पदांना मंजुरी
By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 6, 2023 10:57 PM2023-01-06T22:57:17+5:302023-01-06T22:57:46+5:30
Doctor: राज्यभरातील १४३२ नवीन निवासी डॉक्टरांच्या पदांना मंजुरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी नवीन पदांना मंजुरी दिली आहे. तसा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निघाला आहे.
-बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : राज्यभरातील १४३२ नवीन निवासी डॉक्टरांच्या पदांना मंजुरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी नवीन पदांना मंजुरी दिली आहे. तसा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निघाला आहे. सोलापूरला जवळपास ३५ नवीन निवासी डॉक्टर मिळतील, अशी माहिती निवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास काटारे यांनी दिली.
विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी सोमवारी, जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला होता. मंगळवारी, ३ जानेवारी रोजी याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत बैठक घेऊन संप मागे घेण्याची विनंती केली.
दोन दिवसांत निवासी डॉक्टरांची १,४३२ रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले. त्यामुळे डॉक्टरांनी संप मागे घेतला. या प्रश्नी शुक्रवार, ६ जानेवारी रोजी मंत्री महाजन यांनी आदेश काढून नव्या पदांना मंजुरी दिली आहे. याचे निवासी डाॅक्टरांनी स्वागत केले.