तीन पक्षी अभयारण्यांना मंजुरी
By admin | Published: December 5, 2015 09:07 AM2015-12-05T09:07:30+5:302015-12-05T09:07:30+5:30
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात तीन नवीन पक्षी अभयारण्यांना राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यात माहुल शिवडी क्षेत्र, नवी मुंबईतील पाम बिच येथील टीएससी
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात तीन नवीन पक्षी अभयारण्यांना राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यात माहुल शिवडी क्षेत्र, नवी मुंबईतील पाम बिच येथील टीएससी - एनआरआय पाणथळ जमीन आणि पांजे फुंडे क्षेत्र यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
फ्लेमिंगो पक्षी अधिवास सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याच बैठकीत मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्पासही वन विभागाची मान्यता देण्यात आली. राज्य वन्यजीव मंडळाच्या शिफारसीसह हा प्रस्ताव आता राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठविण्यात येईल.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्री कर्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, वन सचिव विकास खारगे, यांच्यासह राज्य वन्य जीव मंडळाचे सदस्य तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य वन्यजीव मंडळाच्या नवव्या बैठकीत मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प चर्चेसाठी सादर करण्यात आला होता. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आवश्यकतेनुसार तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करून उपशमन योजना (मेटीगेशन मेजर्स) सुचवाव्यात, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले होते. त्याप्रमाणे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने अभ्यास करून आपल्या उपशमन योजनांचा (मेटीगेशन मेजर्स) अहवाल सादर केला. या अहवालामध्ये सुचिवण्यात आलेल्या सर्व उपशमन योजनांवर आज सविस्तर चर्चा होऊन या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
रानडुक्करं उपद्रवी
बीड, लातूर, उस्मानाबाद आणि जळगाव जिल्ह्यातील काही निवडक तालुक्यांमधील गावांकरिता एक वर्षासाठी रोही आणि रानडुक्कर या प्राण्यांना उपद्रवी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
उर्वरित जिल्ह्यांत ज्या ठिकाणी रोही व रानडुकरांचा उपद्रव आहे तिथे या प्राण्यांचा उपद्रव थांबविण्याच्या पद्धतीचा भारतीय वन्यजीव संस्था; डेहराडून यांच्या सहकार्याने शास्त्रशुद्ध अभ्यास करावा व राज्य वन्य जीव मंडळाच्या पुढील बैठकीत त्याचे सादरीकरण व्हावे असे निश्चित करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)
माळढोक पक्षी अभयारण्याच्या क्षेत्रासाठी समिती
राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या ३६व्या बैठकीत माळढोक पक्षी अभ्यारण्याचे क्षेत्र पुनर्गठीत करण्यास मान्यता दिली आहे. मात्र असे करताना माळढोक पक्षी अभयारण्याच्या पुनर्गठनामुळे कमी होणाऱ्या क्षेत्राच्या बदल्यात इतरत्र संरक्षित क्षेत्रात वाढ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते.
त्या अनुषंगाने संरक्षित क्षेत्रात वाढ किंवा नवीन संरक्षित क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मांडण्यात आला असता यासंदर्भात प्रस्तावित कन्हाळगाव अभयारण्य निर्मितीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी व या समितीने आपला अहवाल तीन महिन्यांत सादर करावा असे निश्चित करण्यात आले.