वाहन नोंदणी करवाढीस मंजुरी
By admin | Published: July 17, 2017 02:41 AM2017-07-17T02:41:10+5:302017-07-17T02:41:10+5:30
राज्यात वाहन नोंदणी कर वाढीस मंजुरी मिळाली आहे. परिवहन आयुक्तांनी दिलेल्या मंजुरीप्रमाणे नवीन करांनुसार दुचाकीसाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात वाहन नोंदणी कर वाढीस मंजुरी मिळाली आहे. परिवहन आयुक्तांनी दिलेल्या मंजुरीप्रमाणे नवीन करांनुसार दुचाकीसाठी ११ टक्के आणि चारचाकीसाठी १५ टक्के कर आकारण्यात येणार आहेत.
जीएसटी लागू करण्याआधी दुचाकी आणि चारचाकी वाहन नोंदणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) आणि जकात नाका यांमधून राज्य सरकारला सुुमारे ७०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, जीएसटीमुळे या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. परिणामी, वाहन नोंदणी करांत वाढ होणे, हे अपेक्षित होते. नोंदणी करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कमाल कर मर्यादा २० लाखांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
सीएनजी वाहनांचा वापर वाढण्यासाठी केवळ त्या वाहनांच्या नोंदणीसाठी ७ टक्के कर आकारण्यात येणार आहे. पेट्रोल वाहन नोंदणी करांमध्ये ११-१३ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. डिझेल वाहन नोंदणीमध्ये १३-१५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
जीएसटीपूर्वी पेट्रोल आणि डिझेल वाहन नोंदणी करापोटी अनुक्रमे ९-११ आणि ११-१३ टक्के भरावे लागत होते. नवीन कर प्रणालीमुळे राज्याला ७५० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाहनांची इंजिन क्षमता, पेट्रोल, डिझेल व सीएनजी अशा वर्गवारीमध्ये नोंदणी कर आकारण्यात येणार आहे.