१११ आरोग्य केंद्रांना मंजुरी

By admin | Published: January 3, 2017 04:44 AM2017-01-03T04:44:12+5:302017-01-03T04:44:12+5:30

ग्रामीण व आदिवासी भागात आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी राज्यात नव्याने ७४ आरोग्य उपकेंद्र, २० प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय, तीन उप जिल्हा रुग्णालये, दोन जिल्हा रुग्णालये

Approved 111 Health Centers | १११ आरोग्य केंद्रांना मंजुरी

१११ आरोग्य केंद्रांना मंजुरी

Next

मुंबई : ग्रामीण व आदिवासी भागात आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी राज्यात नव्याने ७४ आरोग्य उपकेंद्र, २० प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय, तीन उप जिल्हा रुग्णालये, दोन जिल्हा रुग्णालये, चार स्त्री रुग्णालये व सहा ट्रामा केअर युनिट अशा १११ नवीन आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी १३३२ पदे नव्याने निर्माण करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
गोंदिया, उस्मानाबाद, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, सांगली, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, ठाणे व नाशिक या जिल्ह्यात नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. या उपकेंद्रांसाठी आरोग्य सेवक, एएनएम, अंशकालीन स्त्री परिचर अशी २२२ नवीन पदे निर्माण केली जाणार आहे. राज्यात २० ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने सुरू करण्यात येत असून नाशिक, नंदुरबार, सातारा, कोल्हापूर, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांत ही प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत होतील. त्यामध्ये सर्वाधिक १२ प्राथमिक आरोग्य केंद्रे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू होणार असून या आरोग्य केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिश्रक, स्त्री व पुरुष परिचर अशी एकूण २४० पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील मंदाणे येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरू केले जाणार आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब व नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे प्रत्येकी ५० खाटांचे उप जिल्हा रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे १०० खाटांचे उप जिल्हा रुग्णालय सुरू केले जाणार आहे. तसेच सावंतवाडी, कणकवली (जि. सिंधुदुर्ग), वरोरा (जि. चंद्रपूर), देगलूर (जि. नांदेड) येथील उप जिल्हा रुग्णालयात तर राजगुरूनगर (जि. पुणे) व सटाणा (जि. नाशिक) येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर युनिट सुरू करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Approved 111 Health Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.