रत्नागिरीतील मत्स्यालय १९पासून खुले
By Admin | Published: December 9, 2014 09:55 PM2014-12-09T21:55:00+5:302014-12-09T23:18:41+5:30
मत्स्यालयामध्ये गोड्या पाण्यातील माशांच्या व सागरी माशांच्या जवळपास १०० प्रजाती
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राने विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाडगाव, रत्नागिरी येथे एक प्रेक्षणीय असे मत्स्यालय सुरु केले आहे. या मत्स्यालयाचे उद्घाटन डॉ. लवांडे यांच्याहस्ते करण्यात आले. १९पासून ते पर्यटकांसाठी खुले होत आहे.
याप्रसंगी संशोधन संचालक, महाराष्ट्र कृषी परिषद, पुणेचे डॉ. शिंगारे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, विद्यापीठ अभियंता दिलीप महाले, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय जोशी, संशोधन केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, डॉ. हुकमसिंह धाकड व अभिरक्षक डॉ. संतोष मेतर, मत्स्य महाविद्यालय, शिरगावचे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगावचे सर्व अधिकारी व कर्मचारी, नारळ संशोधन केंद्राचे खांडेकर, कृषी संशोधन केंद्र, शिरगावचे वाघमोडे उपस्थित होते. हे मत्स्यालय गुरुवार, ११ डिसेंबर रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
मत्स्यालयामध्ये गोड्या पाण्यातील माशांच्या व सागरी माशांच्या जवळपास १०० प्रजाती ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये अरोवाना मासा, हम्पी हेड फ्लॉवर हॉन मासा, डिस्कस मासे असे गोड्या पाण्यातील आकर्षक मासे तर लायन फिश, फिदर स्टार फिश, बटर फ्लाय माशांच्या विविध प्रजाती, निमो मासे व डॅमसेल माशांच्या विविध प्रजाती असे विविध सागरी मासे ठेवले असल्याने मत्स्य शौकिनांसाठी ते नक्कीच आकर्षण ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्लांटेड अॅक्वेरिअमच्या शौकिनांकरिता विविध २० प्रकारच्या पाणवनस्पतींनी सजविलेले व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सजविलेले प्लांटेड अॅक्वेरिअमही विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
मत्स्य संग्रहालयामध्ये विविध २५४ समुद्री जलचर प्रजाती रसायनामध्ये जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत. तसेच शंख - शिंपल्यांच्या विविध प्रजातीही प्रदर्शनामध्ये ठेवल्या आहेत. मत्स्य संग्रहालयातील डॉल्फीन मासा, ४० फूटी लांबीचा महाकाय देवमाशाचा सांगाडा व ५० वर्षांहून जास्त काळ जतन केलेले जीवंत कासव पर्यटकांचे विशेष लक्ष वेधतात. मत्स्यालय व मत्स्य संग्रहालयास विद्यार्थ्यांनी व पर्यटकांनी भेट दिल्यास त्यांच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. पर्यटक तसेच शालेय विद्यार्थी यांच्यासाठी आठवड्याचे सातही दिवस सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ या वेळेत मत्स्यालय खुले असेल.
या कार्यक्रमाकरिता डॉ. हुकमसिंह धाकड, डॉ. बी. आर. चव्हाण, अभिरक्षक डॉ. संतोष मेतर, सहायक संशोधन अधिकारी नरेंद्र चोगले, सचिन साटम, कुलकर्णी ,व्ही. आर. सदावर्ते, ए. एन. सावंत, महेश पाडावे, छाया चव्हाण कर्मचारीवर्गाने विशेष मेहनत घेतली. (प्रतिनिधी)